Sun, Jul 12, 2020 15:24होमपेज › Pune › स्वच्छता अभियानास केराची टोपली

स्वच्छता अभियानास केराची टोपली

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:31AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छ शहर अभियान राबविले जात आहे. त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन महापालिकेने केले आहे; मात्र दुसरीकडे मराठी चित्रपटाची भित्तिपत्रे (पोस्टर) शहरातील सर्वच भागांत चिकटविली गेली आहेत. त्यामुळे एकीकडे सफाईद्वारे सुशोभीकरण, तर दुसरीकडे विद्रूपीकरण सुरू असून, स्वच्छता अभियानास केराची टोपली दाखविल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.  महापालिकेने या प्रकरणी दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत स्वच्छ शहर सर्वेक्षण 4 जानेवारीपासून पिंपरी-चिंचवड शहरात केले जाणार आहे. त्यासाठी केंद्रातून विशेष समिती शहरात येऊन स्वच्छता पाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. महापालिकेनेही स्वच्छ शहर स्पर्धेत आपला क्रमांक सुधारावा म्हणून कंबर कसली आहे. त्यासाठी विविध उपक्रम हाती  घेतले आहेत. नागरिक, विद्यार्थ्यांसह महापालिका अधिकारी व कर्मचार्‍यांसह त्यांच्या कुटुंबीयांना केंद्र शासनाचे ‘स्वच्छता’ हे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार नागरिक व विद्यार्थी सदर अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून महापालिकेस प्रतिसाद देत आहेत; तसेच शहरात स्वच्छता अभियान रॅली काढून आणि होर्डिंग्ज लावून जनजागृती केली जात आहे; मात्र दुसरीकडे शहर विद्रूपीकरणाचे काम सुरू आहे.

शुक्रवारी (दि.22) प्रदर्शित झालेल्या एका मराठी चित्रपटाची पोस्टर शहरात चिकटवली गेली आहेत. उड्डाणपुलाच्या भिंती, सीमाभिंती, बसथांबे, डीपी बॉक्स, पानटपरी अशा विविध ठिकाणी असंख्य प्रमाणात ही पोस्टर लावली गेली आहेत. त्यामुळे शहर विद्रूप दिसत आहे; तसेच विविध जाहिरात करणार्‍या पांढर्‍या रंगाची पोस्टर आणि सर्कसची पोस्टरही डीपी बॉक्स, भिंती, बसथांबे आदी ठिकाणी चिकटविण्यात आली आहेत.  एकीकडे महापालिका स्वच्छतेची मोहीम हाती घेऊन शहर स्वच्छ आणि सुशोभित करीत आहे; मात्र दुसरीकडे काही मंडळी शहरात बिनधास्तपणे कोठेही पोस्टर लावून शहर विद्रूप करीत आहेत. या संदर्भात महापालिकेने त्वरित कारवाई करून संबंधितांना दंड आकारावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.