Thu, Feb 21, 2019 02:59होमपेज › Pune › रिक्त पदे भरण्याबाबत केंद्राकडून दाद नाही

रिक्त पदे भरण्याबाबत केंद्राकडून दाद नाही

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी :प्रदीप लोखंडे 

मोहननगर येथील राज्य कामगार विमा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याबाबत अधिकार्‍यांकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला; मात्र केंद्राकडून याची दखलच घेतली जात नाही. अपुर्‍या कर्मचार्‍यांसह कारभार करावा लागत असल्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार होत नाहीत. अनेक वेळा रुग्णांना उपचारासाठी बाहेरच्या रुग्णालयाची वाट दाखविण्याची वेळ येत आहे. वारंवार पाठपुरावा करून आता अधिकारीही हतबल झाले आहेत.  

रुग्णालयातील रिक्त पदे भरणे गरजेचे असताना, 6 ते 7 वर्षे अनेक पदे भरलीच नाहीत.  पदे मंजूर असूनही ती अद्यापही रिक्त का ठेवली आहेत, असा प्रश्‍न आहे, तर काही रिक्त पदे भरून त्यांना इतर ठिकाणी नियुक्त केले आहे. तज्ज्ञांच्या अनेक रिक्त जागांमुळे रुग्णांना इतर रुग्णालयाची वाट दाखवावी लागत आहे. 

साथीच्या आजाराबरोबर व हृदयाशी संबंधित अशा अनेक खर्चिक आजारांचे रुग्ण या रुग्णालयात येतात. त्यांना तत्काळ सुविधा देणे गरजेचे आहे; मात्र त्यांच्याकडे लक्ष देणे शक्य होत नाही 
 पूर्वी हे रुग्णालय 50 बेडचे होते. कामगारांची वाढती संख्या लक्षात घेता सध्या हे रुग्णालय 100 बेडचे आहे. यानुसार आवश्यक असणारी बेड व तज्ज्ञांची संख्याही वाढविणे गरजेचे होते; मात्र अद्यापही परिस्थिती जैसे थेच आहे. एक्स-रे काढण्यासाठीची मशिन्स उपलब्ध आहेत; मात्र त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञच नाहीत.

एप्रिल 2014 मध्ये रेडिओलॉजिस्टनी राजीनामा दिला होता, तेव्हापासून हे पद रिक्तच आहे. कंत्राटी कामगारांची मर्यादा 55 आहे. त्यामध्ये 28 भरलेले असून 27 पदे रिक्तच आहेत. सिस्टरची  11 पैकी केवळ एकच पद भरले असून, 10 पदे रिक्तच आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञांची 30 पैकी 14 पदे रिक्तच आहेत. रुग्णालयातील दंतरोगतज्ज्ञ हे पद देखील रिक्त असल्याने कामगार रुग्णांना व कुटुंबीयांना उपचाराविनाच परत जावे लागत आहे. 6 ते 7 वर्षांपेक्षा अधिक कालावधी होऊनही हे पद भरले गेलेले नाही.