पिंपरी : प्रतिनिधी
शेतकरी आपला माल विक्री होण्यासाठी कोणती शक्कल लढवतील याचा नेम नाही. भोसरीमध्ये शुक्रवारी (दि.24) पीएमटी चौकात स्कार्पिओमध्ये मेथीच्या भाजीचा स्टॉल लावला होता. त्यामुळे स्कार्पिओतील मेथी घेण्यासाठी ग्राहकांनी रांग लावली होती. त्यामुळे काही जणांच्या मुखात मेथीच्या भाजीचे भाग्य उजळले, अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
शुक्रवारी दुपारी दोनदरम्यान दावडी येथील दोन तरुण शेतकर्यांनी स्कार्पिओमध्ये चक्क मेथीच्या भाजीचा स्टॉल लावला होता. व्यापार्याला मेथीच्या गड्ड्या देण्यासाठी शेतकरी उभा असेल, असा अनेकांचा भास झाला होता; परंतु काही वेळाने या तरुण शेतकर्यांनी दहा रुपयाला एक, तर वीस रुपयांना तीन गड्ड्या अशी अरोळी देण्यास सुरुवात केली. ही मेथी व्यापार्यांना नव्हे, तर शेतकर्यांनी ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी नामी शक्कल शोधून काढली होती. मेथीची भाजी, पाटी, कॅरेट, तीन, चार चाकी टेम्पो या व्हॅनमधून अलीकडे विक्री केली जात आहे.
अनेक शेतकर्यांनी व्यापार्यांकडे न जाता दारोदारी जाऊन भाजी विकणे सुरू केले आहे. त्यामुळे ग्राहकालाही सरळ शेतातून आलेली ताजी भाजी आणि व्यापार्यांपेक्षा कमी किमतीला ती मिळत असल्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यात आता चक्क स्कार्पिओमध्येच मेथीच्या भाजीचा स्टॉल लावल्यामुळे सर्वांनाच त्याचे अप्रूप आहे. शेतकर्यांच्या या नामी शक्कलीमुळे हातोहात मेथीच्या भाजी विकली गेली. त्वरित भाजी विकली गेल्यामुळे तरुण शेतकर्यांमध्येही आनंदाचे वातावरण होते. याबाबत बोलताना ते म्हणाले की, आम्ही सुशिक्षित असूनही वडिलोपार्जित शेती करतो. आमचा तरकारीचा व्यवसाय आहे; परंतु वाडवडील पारंपरिक पद्धतीने शेती व तरकारीचा व्यवसाय करत होते. त्याला फाटा देऊन तरकारी विकण्यासाठी नामी शक्कल लढवीत चक्क मानाची गाडी समजणार्या स्कार्पिओमधून मेथीची भाजी विकण्याची कल्पना प्रत्यक्षात उतरल्यामुळे आणि ती यशस्वी झाल्यामुळे तरुण शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.