Tue, Mar 26, 2019 20:02होमपेज › Pune › नऊ महिन्यांत ३११ कोटी रुपयांचा मिळकतकर जमा

नऊ महिन्यांत ३११ कोटी रुपयांचा मिळकतकर जमा

Published On: Jan 02 2018 1:51AM | Last Updated: Jan 02 2018 1:03AM

बुकमार्क करा
पिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांनी 31 डिसेंबर 2017 पर्यंत तब्बल 311 कोटी 60 लाख रुपयांचा मिळकतकर भरणा केला आहे. एकूण 2 लाख 38 हजार 546 मालमत्ताधारकांनी कर भरला आहे. त्यांतील 1 लाख 1 हजार 12 मालमत्ताधारकांनी 112 कोटी 52 लाख रुपये ऑनलाईनद्वारे जमा केले आहेत, अशी माहिती महापालिकेचे सहआयुक्त दिलीप गावडे यांनी सोमवारी (दि.1) दिली. महापालिकेच्या करसंकलन विभागामार्फत मिळकतकर वसुलीसाठी गेल्या 15 दिवसांपासून कठोर कारवाई सुरू करण्यात आली होती.

एकूण 16 थकबाकीदारांवर कारवाई करून 1 कोटी 54 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. मिळकतकराचा भरणा न करणार्‍या मिळकतधारकांवर यापुढे मोठ्या प्रमाणात जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे, तरी मिळकतधारकांनी कराचा भरणा करून मिळकत जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन गावडे यांनी केले आहे. शहरातील एकूण 2 लाख 38 हजार 546 मिळकतधारकांनी 311 कोटी 60 लाख रुपयांचा मिळकतकराचा भरणा केला आहे.  ऑनलाईन माध्यमातून शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात मिळकतकर भरणा करीत आहेत. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. 31 डिसेंबरअखेर 1 लाख 1 हजार 12 मिळकतधारकांनी 112 कोटी 52 लाख रुपये ऑनलाईन जमा केले आहेत. ऑनलाईनद्वारे कराचा भरणा करून चालू वर्षाच्या सामान्यकरातील 2 टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

थकबाकीसह दुसर्‍या सहामाहीची मिळकतकराची रक्कम 31 डिसेंबरअखेर भरणा न करण्याची मुदत संपल्याने करसंकलन विभागामार्फत मोठ्या थकबाकीदारांवर मालमत्ता  जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे,  तरी मिळकतधारकांनी तत्काळ कराचा भरणा करून जप्तीची कारवाई टाळावी. नवीन व वाढीव बांधकाम आणि वापरात बदलाची नोंद आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित करसंकलन कार्यालयात करावी, असे आवाहन गावडे यांनी केले आहे.  अर्ज महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.