Mon, Jun 24, 2019 21:05होमपेज › Pune › पंतप्रधान आवास ला केंद्राचीही मंजुरी

पंतप्रधान आवास ला केंद्राचीही मंजुरी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत चर्‍होली, रावेत आणि मोशीतील बोर्‍हाडेवाडीमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणार्‍या गृहप्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास (डीपीआर) केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीने बुधवारी (दि.29) मंजुरी दिली. त्यामुळे शहरात पंतप्रधान आवास योजनेचे बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सदर तीन ठिकाणी एकूण 3 हजार 664 सदनिका बांधण्यात येणार आहेत. 

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर नसणार्‍यांना घर दिले जाणार आहे. योजनेसाठी नागरिकांकडून अर्जही मागविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे झोपडपट्ट्यांचे स्वतंत्र  सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. महापालिका या योजनेअंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या भागांत 10 ठिकाणी एकूण 9 हजार 458 सदनिका बांधणार आहे. त्यानुसार चर्‍होली येथे 1 हजार 442 (खर्च 150 कोटी 32 लाख), रावेतमध्ये 934 (खर्च 91 कोटी 6 लाख), डुडुळगावमध्ये 896, दिघीत 840, मोशीतील बोर्‍हाडेवाडीमध्ये 1 हजार 288 (खर्च 135 कोटी 90 लाख), वडमुखवाडीत 1 हजार 400, चिखलीमध्ये 1 हजार 400, पिंपरीत 300, पिंपरीतच आणखी 200 आणि आकुर्डीमध्ये 500 घरे उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. महापालिकेने या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून तो राज्य शासनाकडे  मंजुरीसाठी पाठविला होता. 

राज्य शासनाच्या तांत्रिक समितीने चर्‍होली, रावेत आणि बोर्‍हाडेवाडीतील एकूण 3 हजार 664 घरे बांधण्याच्या डीपीआरला 10 नोव्हेंबर रोजी मंजुरी दिली. त्यानंतर हा डीपीआर केंद्र सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात आला. केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीने अवघ्या 19 दिवसांत महापालिकेच्या योजनेच्या तीन प्रकल्पांना अंतिम मंजुरी दिली आहे. त्याबाबत केंद्राच्या संबंधित तांत्रिक समितीने बुधवारी (दि. 29) महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे चर्‍होली, रावेत आणि बोर्‍हाडेवाडी येथे सर्वसामान्यांना परवडतील, अशी एकूण 3 हजार 664 घरे उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या तीनही ठिकाणच्या प्रकल्पांना एकूण 377 कोटी 28 लाखांचा खर्च केला जाणार आहे.