Wed, Feb 20, 2019 23:40होमपेज › Pune › बसचा ‘टाईम’ नाही ‘सेट’ नागरिकांना करावा लागतोय ‘वेट’

बसचा ‘टाईम’ नाही ‘सेट’ नागरिकांना करावा लागतोय ‘वेट’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रदीप लोखंडे 

निगडी बसस्टॉप येथून येरवडा व कोरेगाव पार्क येथे जाण्यासाठी कमी बसची संख्या आहे. बसच्या येण्या-जाण्याचीही वेळ लावण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना दीड तास बसची वाट पाहावी लागत आहे. त्याबाबत संबंधितांशी संपर्क साधल्यास ते उद्धट बोलत आहेत. त्यामुळे बसचा ‘टाईम’ नाही ‘सेट’ नागरिकांना करावा लागतोय ‘वेट’ असे चित्र निगडी बसस्टॉपवर आहे. कामानिमित्‍त निगडीतून पुण्याला जाण्यासाठी भक्‍ती-शक्‍ती व निगडी पवळे उड्डाणपुलाखाली नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली असते.

कामगार, विद्यार्थी व गृहिणी देखील पुण्यामध्ये कामानिमित्‍त जात असतात. प्रवाशांची संख्या पाहता बसची संख्याही मोठी ठेवणे गरजेचे आहे, तरी देखील निगडीतून येरवडामार्गे कोरेगाव पार्क  व इतर ठिकाणी जाण्यासाठी असणारी बसची संख्या कमी आहे. अनेक वेळेला नियोजित बसही रद्द केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना एक ते दीड तास वाट पाहावी लागत आहे. उशीर झाल्यामुळे पुढे नियोजित कामे रखडली जात आहेत. त्याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे.

निगडी येथील बसस्टॉपवर बसच्या ये-जा करण्याचे वेळापत्रकही लावण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना बस कधी येणार याबाबत शाश्‍वती नसते. या ठिकाणी बसण्यासाठीही पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे अनेकांना उन्हामध्ये उभे राहूनच बसची वाट पाहावी लागत आहे. बस स्टॉप आणि बसची देखील दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे. बसच्या वेळेबाबत चौकशी करण्यासाठी नागरिक संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधत आहेत. त्या वेळी तुम्ही भक्‍ती-शक्‍ती चौकात बसण्यासाठी या. बस येईल त्या वेळी बसा, अशी उद्धट उत्‍तरे दिली जात आहेत. त्यामुळे नागरिकांमधून संतापाची भावना व्यक्‍त केली जात आहे.

शहरात बसची संख्या कमी आहे. त्यामध्येही ज्या बस रस्त्यावर धावत आहेत, त्या वारंवार बंद पडत आहेत. कर्मचारी नियम पाळताना दिसत नाहीत. अनेक बसेसना खिडक्या नसतात. त्याचा मनस्तापही नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे निगडीहून येरवडामार्गे, वाघोली, कोरेगाव पार्कसाठी जाणार्‍या बसची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. याबाबत पीएमपीएमएलच्या संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. 
 

 

 

 

tags ; pimpri,news,Yervada, Koregaon, Less, number,buses,


  •