Sun, Jul 21, 2019 16:15
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › रंगभूमीतूनच अभिनयसंपन्नता येते

रंगभूमीतूनच अभिनयसंपन्नता येते

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

 पिंपरी :  पूनम पाटील

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जगभरात उत्साहाचे वातावरण आहे; मात्र गेल्या काही वर्षांत शहरातील युवा पिढी रंगभूमीपासून दूर जात असून, अभिनय क्षेत्रात स्थिरावण्यासाठी नाटकांऐवजी दुसर्‍या माध्यमांचा वापर करताना दिसत आहे; मात्र असे असले, तरी अभिनयसंपन्नता येण्यासाठी रंगभूमीवर काम करणे आवश्यक असून, त्यातूनच अभिनय परिपक्व होतो, असे मत ज्येष्ठ रंगकर्मींनी व्यक्त केले आहे. तसेच, दुरावणारा युवा प्रेक्षक नाट्यप्रवाहात आणण्यासाठी सर्व निर्मात्यांनी आणि रंगकर्मींनी जबाबदारीने काम करून रंगभूमीचे महत्त्व टिकवणे गरजेचे असून, नवीन रंगकर्मींची नवीन पिढी रंगभूमीवर आणण्यासाठी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त एकत्र येऊन पाऊले उचलली पाहिजेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ रंगकर्मींनी व्यक्त केली आहे. 

1946 मध्ये पॅरिसमध्ये युनेस्कोच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय नाट्य संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानिमित्त जगभरातील नाट्यसंस्था व नाट्यकर्मी 27 मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा करतात. या दिवशी जगभरात विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शहरात मात्र याबाबत उदासीनता दिसून येते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जागतिक रंगभूमी दिनाबद्दल जागरुकता नाही. नाटकांऐवजी तरुण पिढीला आता फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटरसारखे पर्याय उपलब्ध झाले आहेत.

त्यामुळे नाटक हा त्यांच्यासाठी शेवटचा पर्याय असल्याने त्यांनी नाटकाकडे पाठ फिरवली आहे. यासाठी नाट्यकर्मींनी सोशल मीडियाला नाटकाचा शत्रू न मानता त्याचा वापर करून तरुण पिढीला नाट्यक्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करावा; मात्र हे करताना रंगकर्मींना अनंत अडचणी येतात; कारण रंगकर्मींना या ना त्या कारणाने व सततच्या दुरुस्तीच्या कामांमुळे नाट्यगृहे मिळत नाहीत. त्यासाठी प्रशासकीय मदत झाल्यास नाट्यचळवळ विकसित होईल, अशी आशा शहरातील रंगकर्मींनी व्यक्त केली आहे. 


  •