Thu, Feb 21, 2019 13:39होमपेज › Pune › पिंपरी शहर भाजपात गटबाजी

पिंपरी शहर भाजपात गटबाजी

Published On: Jan 14 2018 1:53AM | Last Updated: Jan 15 2018 7:26AM

बुकमार्क करा
 पिंपरी : संजय शिंदे

महापालिकेत भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आहे. शहरात विकास होईल अशी धारणा राष्ट्रवादी काँग्रेसला घरी बसवून भाजपाला मतदान करणार्‍यांची होती; परंतु ‘अच्छे दिन’ मतदारांना नव्हे, तर पालिकेत सत्तेत असणार्‍यांना आले आहेत. त्यामुळे पालिका आणि शहर संघटनेवरील वर्चस्वातून अंतर्गत वादाने पुन्हा तोंड वर काढले आहे.  पारदर्शक कारभारातून शहराचा विकास करू असे आश्‍वासन देणार्‍यांचे समर्थकच ठेकेदारीतील रिंगमध्ये अडकल्याचा आरोप होत आहे, तर दुसरीकडे खुद्द उपमहापौरांनाच पाण्यासाठी सत्तेच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा द्यावा लागत असल्यामुळे, संघटना व पालिका कारभाराबाबत प्रदेशस्तरावर लक्ष देण्याची वेळ आल्याच्या चर्चेला शहरात उधाण आले आहे. 

पिंपरी-चिंचवड शहर भाजपा संघटना वरून जरी मजबूत वाटत असली, तरीही अंतर्गत वादाने ‘व्यक्ती पूजे’चे ग्रहण लागल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत. 77 नगरसेवक निवडून आणून पालिकेवर भाजपचे कमळ फुलविण्यात शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप, सहयोगी आ. महेश लांडगे, राज्यसभा सदस्य अमर साबळे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे हे यशस्वी झाले; मात्र सत्तेत आल्यानंतर पालिका व संघटनेतील पदाधिकारी सत्तेवर व संघटनेवर अंकुश ठेवण्यात अयशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.

गुजरातच्या निवडणुकीनंतर भाजपाने  लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे.  राज्यातील विविध जिल्हा, तालुका व गावपातळीवर भाजपातील गटबाजी मिटविण्यासाठी प्रदेशस्तरावरून प्रयत्न सुरू असताना, पिंपरी-चिंचवडमध्ये ‘एक व्यक्ती, एक पदा’वरून जोरदार राजकारण तापले आहे. त्यातून एका संघटन सरचिटणीस व एका सरचिटणीसाचा बळी देण्यात आल्याचे वृत्त आहे. गटातटाचे नाव न लावता एकापेक्षा अधिक पदे असणार्‍यांवर कारवाई का करण्यात येत नाही, असा मतप्रवाहही शहर पातळीवरून उपस्थित करण्यात येत आहे.  
पक्षसंघटनेबाबत कार्यकर्त्यांच्या तक्रारींवरून गेल्या सहा महिन्यांत प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत शहरस्तरावर दोन ते तीन बैठका झाल्या आहेत. त्यामध्ये संघटनेच्या कामासाठी निवडलेले पदाधिकारी, नवनिर्वाचित नगरसेवक लक्ष देत नाहीत.

मंडलाध्यक्ष बैठकांना उपस्थित राहात नाहीत यावरून संबंधित पदाधिकार्‍यांची कानउघाडणी झाली आहे, तरीही पक्षांतर्गत गटबाजीला खतपाणी घालण्यात अनेक जण आघाडीवर आहेत.  एकमेकांची उणी-दुणी काढण्याच्या नादात शहरवासीयांचे मुख्य प्रश्‍न बाजूला पडले आहेत, हे उपमहापौरांच्या उपोषणाच्या इशार्‍यावरून समोर आले आहे.  सत्तेत असणार्‍याच पदाधिकार्‍यांना जर सुविधासांठी प्रशासनाला इशारा द्यावा लागत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्याअनुषंगाने  मंगळवारी (दि. 16) होणार्‍या पक्षसंघटनेच्या आढावा बैठकीकडे  शहर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.