Thu, Apr 25, 2019 13:28होमपेज › Pune › उन्हाचा चटका वाढला; तापमान 38 अंशांवर

उन्हाचा चटका वाढला; तापमान 38 अंशांवर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी  ; प्रतिनिधी

गेल्या आठ दिवसांपासून शहरात उन्हाचा कडाका वाढला असून, शहराचा पारा चाळिशीकडे झुकला आहे. मंगळवारी (दि. 27) शहराचे कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 17.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. संपूर्ण राज्यात 30 मार्चपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, तापमानात वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानंतर शहरातील तापमानात वाढ होत असून, उन्हाचा कडाका वाढला आहे.

शहराचे तापमान चाळिशीकडे वाटचाल करीत असून, उकाड्याने हैराण नागरिकांची पावले शीतपेयांच्या दुकानांकडे वळत आहेत. वाढलेल्या उन्हामुळे शीतपेयांना देखील मागणी वाढली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी पांढर्‍या कपड्यांना मागणी असून, शहरात ठिकठिकाणी रसवंती गृहे सुरू झाली असल्याचे चित्र आहे.  या हंगामात पहिल्यांदाच तापमान 40 अंशांजवळ पोचले असून, दिवसभर उन्हाने होणारी धगधग आणि असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.

भर दुपारी उन्हाच्या झळा बसत असून, नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना स्कार्फ, टोपी, सनकोट घालूनच बाहेर पडताना दिसत आहेत. शहराच्या किमान तापमानात अंशतः वाढ झाली असून, मार्च महिनाअखेरीस उन्हाचा चटका वाढल्याने जिवाची काहिली होऊ लागली आहे. आकाश निरभ्र असल्याने दिवसाच्या तापमानात वाढ होत आहे. सकाळी दहा-साडेदहापासूनच उन्हाची तीव्रता वाढत असून, घामाच्या धारांनी शहरवासीय हैराण झाले आहेत. पुढील काही दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता असून, नागरिकांनी उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. 
 


  •