Mon, Jun 17, 2019 03:07होमपेज › Pune › आग लागू नये यासाठी पिंपरी-चिंचवड पालिका काळजी घेणार

आग लागू नये यासाठी पिंपरी-चिंचवड पालिका काळजी घेणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी  ; प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोला काल आग लागली. वाढत्या तापमानामुळे व मोठ्या प्रमाणावर वारे असल्याने आग लागल्याची शक्यता पालिकेने व्यक्त केली आहे. वाढता उन्हाळा व वाढलेले तापमान लक्षात घेऊन यापुढे अशा आगी लागू नयेत यासाठी महापालिकेच्या वतीने योग्य ती दक्षता व खबरदारी घेण्यात येईल, असे महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

याबाबत कुलकर्णी म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोमधील ‘सॅनिटरी लँड फिल’ टप्पा 1 येथे गेल्या 6 ते 7 वर्षांपासून टाकण्यात आलेल्या व प्रक्रिया केलेल्या कचर्‍याला गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. त्यानुसार पावणेआठ वाजता भोसरी व पालिकेच्या अन्य अग्निशामक केंद्रांना कळविण्यात आले. पालिकेचे सहा फायर टेंडर, एमआयडीसी, टाटा मोटर्स, पुणे महापालिका यांचे प्रत्येकी एक याप्रमाणे नऊ फायर टेंडरद्वारे आग विझविण्याचे काम चालू करण्यात आले. तथापि कचर्‍यातील प्लास्टिक, फायबर व थर्माकोलमुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली.

वाढत्या तापमानामुळे; तसेच सायंकाळी सहानंतर मोठ्या प्रमाणात वारे असल्याने आग लागली असण्याची शक्यता आहे. कचर्‍याच्या ढिगार्‍यामधून खालून मिथेन वायू बाहेर येत असल्याने व सदरचा वायू ज्वलनशील असल्याने आग नियंत्रणात अडचण येत आहे. सदरची आग लागल्याने व वारे पश्‍चिमेकडून पूर्वेकडे वाहत असल्याने चर्‍होलीच्या बाजूस मोठ्या प्रमाणात धूर पसरला. आ. महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पर्यावरण व अग्निशामक विभागास योग्य त्या सूचना दिल्या. त्यानुसार सकाळी पाचपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. 

आज शुक्रवारीही जळत असलेल्या कचर्‍यावर माती व पाणी पसरण्याचे काम करण्यात येत आहे. वाढते तापमान लक्षात घेऊन, यापुढे कचरा डेपोला आगीच्या अशा घटना घडू नये यासाठी काळजी घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
 


  •