Sun, Jul 21, 2019 01:28होमपेज › Pune › सेरेब्रल पाल्सीग्रस्त कणाद याने केले 11 किल्ले सर

सेरेब्रल पाल्सीग्रस्त कणाद याने केले 11 किल्ले सर

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 14 2018 12:23AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

चिंचवड येथील कणाद पिंपळनेरकर या सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलाने नाशिक व धुळे जिल्ह्यातील एकूण अकरा गिरिदुर्ग सर करून आपला अकरावा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. 
नाशिक जिल्ह्यातील 7 आणि धुळे जिल्ह्यातील 4 असे एकूण 11 गिरिदुर्ग कणादने सात दिवसांत सर केले. कणाद जन्मानंतर काही दिवसांनी सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रस्त झाला. या आजाराने ग्रस्त असलेल्याचा शारीरिक विकासाबरोबर मानसिक विकास मंदावतो. या आजारामुळे शिकण्यास वेळ जास्त लागतो. 

कणाद गेली काही वर्षे पुणे येथील बालकल्याण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे. कणादने चालायला शिकावे यासाठी अनेक उपचार केले; परंतु बालरोगतज्ज्ञांनी कणाद कधीच चालू शकणार नाही, असे सांगितले होते. होमिओपॅथीच्या एका डॉक्टराने दिलेला विश्वास आणि उपचारांमुळे कणाद वयाच्या पाचव्या वर्षी स्वतःच्या पायावर अडखळत चालू लागला. देहूरोड येथील आयप्पाची टेकडी चढण्यास कणादला प्रोत्साहन दिल्यावर तिथे तो हळूहळू चालू लागला. टेकडी चढण्याचा कणादचा पहिला प्रयत्न यशस्वी  झाला.

इथेच कणादची टेकड्यांवर चालण्याची, निसर्गात रमण्याची आवड त्याच्या आई-बाबांच्या लक्षात आली. मग जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तसे व वेळ काढून कणादला त्याचे आई-बाबा आयप्पा टेकडी, घोरावडेश्वरचा डोंगर, रामाडी डोंगर आणि दुर्गा टेकडी अशा वेगवेगळ्या ठिकाणी चालायला घेऊन जाऊ लागले. कणादसुद्धा या वेगवेगळ्या ठिकाणी रमत होता, इथला निसर्ग, परिसर नवलतेने बघत होता, काही ना काही शिकत होता; पण चालण्यासाठी कधीही कंटाळा करत नव्हता. यामुळे त्याच्या आई-बाबांचा धीर अजूनच वाढला. सन 2013 साली कणादने आई-बाबांसोबत एका दिवसात शिवनेरी किल्ला आणि लेण्याद्री चढून ट्रेकिंगचा श्री गणेशा केला. त्यानंतर दोन वर्षांत जेजुरी, सप्तशृंगी, कोरीगड, सज्जनगड, तिकोना, पुरंदर, सिंहगड, लोहगड असे किल्ले चढल्यामुळे त्याचा उत्साह आणि आवड वाढू लागली. 2014 साली गुजरात येथील गिरनार पर्वत 13 तासांत चढून उतरला.

2017 साली वैष्णोदेवी येथेही कणाद यशस्वीरीत्या चढून उतरला. कणादची ट्रेकिंगची आवड हेरून त्याच्या वडिलांनी त्याचा अकरावा वाढदिवस जमेल तितक्या किल्ल्यांवर जाऊन साजरा करण्याचे ठरवले. 24 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2017 या कालावधीमध्ये 11 किल्ले चढून कणादने 11 वा वाढदिवस साजरा केला. नाशिक जिल्ह्यातील किल्ले अंजनेरीपासून सुरुवात करून धुळे जिल्ह्यातील किल्ले गाळणा, किल्ले लळिंग, किल्ले सोनगीर, किल्ले भामेरपर्यंत तीन दिवसांत पाच किल्ले चढून उतरले. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील मांगी-तुंगी, मुल्हेर, रामशेज आणि अंकाई-टंकाई हे सहा किल्ले उरलेल्या चार दिवसांत सुखरूप चढून उतरले. कणादचे वडील हे प्रशिक्षित व हौशी ट्रेकर आहेत. त्यामुळे या गिरिदुर्गांवर जाण्याआधी त्यांनी सर्व सविस्तर माहिती एकत्रित करून अभ्यास करून कणादची क्षमता ओळखूनच काही किल्ल्यांची निवड केली होती. त्याचबरोबर सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही ‘बॅकअप टीम’शिवाय मात्र कणादच्या डॉक्टरांचे मार्गदर्शन घेऊनच हे सर्व किल्ले चढले.