होमपेज › Pune › पिंपरीत गडकरी-मुंडे गटाची एकजूट

पिंपरीत गडकरी-मुंडे गटाची एकजूट

Published On: Feb 27 2018 1:57AM | Last Updated: Feb 27 2018 1:57AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ‘अर्थ’कारणाची ‘गुरुकिल्ली’ असलेल्या स्थायी समितीची सूत्रे ताब्यात ठेवण्यासाठीही सत्ताधारी भाजपमधील जुन्या गटाने (गडकरी-मुंडे) जोरदार ‘लॉबिंग’ केले आहे. विद्यमान समितीला आता जास्त कामे देऊ नका; आमच्यासाठी कामे शिल्लक ठेवा...असा दम काही नगरसेवक-पदाधिकारी महापालिका अधिकार्‍यांना भरत आहेत. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नगरसेवक विलास मडीगेरी यांना ‘अध्यक्ष’ बनवण्यासाठी जुन्या गटातील मतभेद विसरून ‘नेते’ कामाला लागले आहेत. दरम्यान, स्थायी समितीसाठी सुरु असलेल्या रस्सीखेचमुळे पंतप्रधान आवास, ‘वेस्ट टू एनर्जी’ आदी प्रकल्पांना खोडा घालण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. याला भाजपमधील ‘नेते’च खतपाणी घालत आहेत. 

परिणामी, भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्या गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपच्या पहिल्या स्थायी समितीची मुदत 28 फेब्रुवारीला संपत आहे. विद्यमान अध्यक्ष  सीमा सावळे यांच्यासह सहा नगरसेवक निवृत्त  होत आहेत. रिक्त 6 जागेवर पक्षाच्या सहा नगरसेवकांची 28 फेब्रुवारी रोजी होणार्‍या सर्वसाधारण सभेत निवड होणार आहे. स्थायी समितीवर वर्णी लागावी यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी आपआपल्या नेत्यांकडे ‘फिल्डिंग’ लावली आहे. त्यातच जुन्या भाजप नेत्यांनी ‘अभी नही तो कभी नही’ अशी भूमिका घेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे उंबरे झीजवले आहेत. आपसातील गट-तट विसरून भाजपमध्ये ‘आयात’ झालेल्यांना मात देण्याची तयारी सुरू केली आहे.

‘ती’ पत्रकबाजी अंगलट येणार..!

सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीच पदाधिकार्यांबाबत पत्रके, निवेदने काढू नयेत. सामंजस्याने मतभेद दूर करावेत. पक्षाच्या प्रतिमेला घातक ठरेल, अशी भूमिका घेऊ नये, अशी सक्त ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांना केली होती. मुंबई येथे झालेल्या बैठकीत पदाधिकारी आणि नेत्यांना बजावले होते. मात्र, तरीही जुन्या गटातील ज्येष्ठ नगरसेवक विलास मडीगेरी यांनी पंतप्रधान आवास योजना अंमलबजावणीबाबत आक्षेपाचे पत्र काढले आहे. 

तसेच, भाजप ‘नेते’ यांनी ‘वेस्ट टू एनर्जी’ आणि ‘घर टू घर कचरा संकलन’ निविदेला विरोध दर्शवत अधिकार्‍यांना ‘तुला बघून घेतो...तुला सांगतो...’ अशी दमबाजी करून प्रशासनावर ‘कंट्रोल’ ठेवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घर’ आणि ‘स्वच्छ भारत’ या महत्त्वाकांक्षी योजनांचा घटक असलेल्या प्रकल्पांविरोधात पत्रकबाजी संबंधित नगरसेवक आणि त्यांच्या मार्गदर्शकांच्या अंगलट येणार? अशी चर्चा शहर भाजपच्या गोटात सुरु आहे.