Thu, Jun 20, 2019 21:52होमपेज › Pune › ‘शोले स्टाईल’आंदोलनामुळे नागरिकांना मिळाले पाणी

‘शोले स्टाईल’आंदोलनामुळे नागरिकांना मिळाले पाणी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

गेल्या तीन महिन्यापासून प्रभाग क्रमांक 20 ला कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. आमच्या प्रभागाच्या वाट्याचे पाणी इतर प्रभागात दिल्यामुळे आमच्याकडे पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. याची कल्पना पाणी पुरवठा विभागाला देऊन ही अधिकारी दुर्लक्ष करत होते. संबंधित अधिकार्‍यांचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही हे ध्यानात आल्यावर भाजप नगरसेविका सुजाता पालांडे यांनी नेहरूनगर येथील पाण्याच्या टाकीवर चढून पाणी पुरवठा विभागाचा निषेध केल्याने पाणी पुरवठा अधिकार्‍यांची धावपळ झाली.

पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता यांनी 24 तासाच्या आत सर्व पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पालांडे खाली उतरल्या. भाजप सत्तेत असून पक्षाच्या नगरसेविकेला मूलभूत सुविधांसाठी आंदोलन करावे लागत असल्याची चर्चा प्रभागात आहे. प्रभाग क्रमांक 20 मधील कासारवाडी, संत तुकाराम नगर, महात्मा फुलेनगर, लांडेवाडी झोपडपट्टी, नाणेकर चाळ परिसरात गेल्या  तीन महिन्यापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या   नागरिकांच्या तक्रारी होत्या.

याबाबत पाणी पुरवठा विभागाला नगरसेविका पालांडे यांनी कल्पना दिली होती ; मात्र याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना ऐन उन्हाळ्यात  पाणी समस्येला तोंड द्यावे लागत होते. नेहरूनगर येथील पाण्याच्या टाकीतून नेहरूनगर परिसर व प्रभाग क्रमांक 20 परिसराला पाणी पुरवठा होतो. दरम्यान याच टाक्यावरून उद्यमनगर व परिसरात येथूनच पाणी पुरवठा करण्यात येत होता; परंतु या भागासाठी मासूळकर  कॉलनी मध्ये बांधलेल्या  आलेल्या पाण्याच्या टाक्यावरून ही पाणी पुरवठा होत असताना पुन्हा नेहरूनगरच्या टाकीवरून का पाणी पुरवठा केला जात आहे असा सवाल पालांडे यांनी उपस्थित केला. मात्र याकडे पाणी पुरवठा अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नेहरूनगर येथील पाण्याच्या टाकीवर चढून पालांडे यांनी पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला.
 


  •