Thu, Apr 25, 2019 07:31होमपेज › Pune › खा.संजय राऊत घेणार झाडाझडती

खा.संजय राऊत घेणार झाडाझडती

Published On: Jan 24 2018 1:47AM | Last Updated: Jan 24 2018 1:09AMपिंपरी  : नंदकुमार सातुर्डेकर

 शिवसेना  शहर प्रमुखपदी योगेश बाबर यांच्या  नियुक्तीवरून पक्षात वादळ उठले आहे. ते शांत करण्यासाठी संपर्कनेते संजय राऊत बुधवारी (दि. 24) पिंपरीत येत आहेत. त्यांना या प्रयत्नात कितपत यश येते याबाबत उत्सुकता आहे. शिवसेना संपर्कनेतेपदाची जबाबदारी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर शहर शिवसेनेत संघटनात्मक बदल होणार हे निश्‍चित होते, त्यानुसार योगेश बाबर यांची नुकतीच शहरप्रमुखपदी नियुक्ती झाली; मात्र त्यांच्या निवडीने अस्वस्थ असणार्‍या गटाने बैठक घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिका निवडणुकीत बंडखोरी केलेल्या बाबर यांची नियुक्ती रद्द न केल्यास पक्षत्यागाचा इशाराही दिला. या परिस्थितीत बाबर यांना काम करणे अवघड होणार आहे. 

शहरात घरमालकांकडून भाडेकरूंवरील अन्यायाविरुद्धच्या संघर्षासाठी काळभोरनगरला शिवसेनेचे रोपटे लावले गेले. फुगेवाडी शाखेचे उद्घाटन, तर खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालेले! मात्र, येथील शिवसैनिक व पक्ष दोघेही सत्तासंघर्षात पोखरले गेले.  गजानन बाबर विरुद्ध बाबासाहेब धुमाळ, बाबर विरुद्ध अगस्ती कानिटकर, खा. बाबर विरुद्ध खा. शिवाजीराव आढळराव पाटील,  बाबर विरुद्ध सुलभा उबाळे,  उबाळे विरुद्ध सीमा सावळे, असे विविध संघर्ष शिवसैनिकांनी अनुभवले. लोकसभेला गजानन बाबर यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिवबंधन तोडले व मनसेत प्रवेश केला आणि शेकापच्या तिकिटावर रिंगणात उतरलेल्या लक्ष्मण जगताप यांची पाठराखण केली.

पुढे भाजपात प्रवेश केला. लोकसभेला युतीतर्फे  मावळातून श्रीरंग बारणे,  शिरूरमधून शिवाजीराव आढळराव हे सेनेचे खासदार निवडून आले. विधानसभेला पिंपरीतून गौतम चाबुकस्वार विजयी झाले. भोसरी व चिंचवडमध्ये सेनेचा पराभव झाला. पालिकेच्या निवडणुकीतही सेनेला पराभवास सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीच्या विरोधात जनतेत असलेल्या असंतोषाचा लाभ उठविण्यात शिवसेना अपयशी ठरली. गटबाजी, पक्षबांधणीकडे दुर्लक्ष, युतीच्या आशेने विजयाचा फाजील आत्मविश्‍वास, परस्पर समन्वयाचा  अभाव, पालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात रान उठविण्यात आलेले अपयश, चुकीचे तिकीटवाटप यामुळे  सेनेचे संख्याबळ 15 वरून 9 वर घसरले.


योगेश बाबर यांच्या  नियुक्तीने सेनेत धूसफूस

निवडणुकीनंतर ‘स्थायी’साठी प्रमोद कुटे यांना डावलल्याने पक्षात धुसफूस वाढली. त्यातच भाजपाने स्मार्ट सिटी कंपनी,  वृक्ष प्राधिकरण समितीवर सेनेला न विचारता प्रमोद कुटे व सचिन भोसले यांच्या परस्पर नियुक्त्या करून भांडणे लावून दिली. भोसले यांनी समितीचा राजीनामा दिला; मात्र कुटे राजीनाम्यास तयार नसल्याने गटनेते राहुल कलाटे यांनी या नियुक्तीस न्यायालयात आव्हान दिले. नवीन शहर प्रमुखपदासाठी शोध सुरू झाला तेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर मते आजमाविली. खा. आढळराव पाटील यांनी सुलभा उबाळे, तर खा. बारणे यांनी योगेश बाबर यांची शिफारस केली होती. योगेश बाबर यांच्या नियुक्तीने पक्षात वादळ उठले आहे. दुसरीकडे मावळ  आपल्याकडे घेण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे. सेनेसाठी ही धोक्याची घंटा आहे. या पार्श्‍वभूमीवर संपर्कनेते संजय राऊत यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.