Tue, May 21, 2019 00:50होमपेज › Pune › ‘वायसीएम’मध्ये स्वाइन फ्लूचा स्वतंत्र कक्ष स्थापन करा

‘वायसीएम’मध्ये स्वाइन फ्लूचा स्वतंत्र कक्ष स्थापन करा

Published On: Sep 12 2018 1:49AM | Last Updated: Sep 12 2018 12:52AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.  जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात स्वाइन फ्लूचा स्वतंत्र कक्ष सुरू न केल्याबद्दल स्थायी समिती सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तातडीने स्वतंत्र कक्ष सुरू करून, सर्वसामान्य रुग्णांना उपचार द्यावेत. तसेच, आजारासंबंधित औषधांचा योग्य प्रमाणात साठा करून ठेवावा, असा सक्त सूचना पालिकेच्या वैद्यकीय विभागास देण्यात आल्या. तब्बल 20 जणांचा बळी गेल्यानंतर पदाधिकार्‍यांना जाग आली आहे. 
समितीच्या मंगळवारी (दि.11) झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. शहरात आतापर्यंत 20 जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. असे असताना वायसीएममध्ये केवळ एकच रूग्ण उपचार घेत असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी सांगितले. वायसीएममधील उपचारावर नागरिकांचा भरवसा नसल्याने रूग्ण खासगी रूग्णालयात उपचार घेत असल्याचा आरोप सदस्यांनी केला.  सदस्य विलास मडिगेरी यांनी सांगितले की, टाटा मोटर्सचा एका कामगारास स्वाइन फ्लू झाला असून, त्याच्यावर 6 दिवसांत 7 लाख रूपये खर्च झाला आहे. इतका भरमसाट खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही. वायसीएममध्ये गेल्या वर्षीप्रमाणे 5 ते 6 खाट्याचे स्वतंत्र कक्ष सुरू करावे. या आजाराची औषधे मोफत उपलब्ध करून द्यावेत, असा सूचना करण्यात आल्या. या आजाराबाबत आवश्यक त्या सर्व दक्षता घेण्यात येत असून, गरजेप्रमाणे स्वाइन फ्लूची औषधे खरेदी करण्यात आली आहेत, असे उत्तर डॉ. रॉय यांनी दिले.