Wed, Apr 24, 2019 07:59होमपेज › Pune › अद्ययावत तारांगणासाठी  साडेदहा कोटींचा खर्च

अद्ययावत तारांगणासाठी  साडेदहा कोटींचा खर्च

Published On: Feb 04 2018 1:56AM | Last Updated: Feb 04 2018 12:26AMपिंपरी : प्रतिनिधी

 महापालिकेच्या वतीने चिंचवडच्या सायन्स पार्कच्या आवारात ‘तारांगण’ उभारले जात आहे. तारांगणात अद्ययावत व अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यासाठी 9 कोटी 73 लाख रुपये खर्च येणार आहे; तसेच देखभाल व दुरुस्तीसाठी 80 लाख रुपये असे एकूण 10 कोटी 53 लाख खर्चास स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. हे काम गोटोइन्क प्लॅनेटेरियम प्रा. लि. ही अमेरिकेची कंपनी करणार असून, लवकरच शहरातील नागरिक व विद्यार्थ्यांना तारांगण पाहता येणार आहे.  

महापालिकेने शहरासाठी पर्यटन आराखडा तयार केला आहे. आराखड्यात चिंचवड येथील सायन्स पार्क, बालनगरी व तारांगणाचे नियोजन आहे. त्यांपैकी एक एकर जागेत सायन्स पार्क बांधले आहे. त्याच्या शेजारी मुंबईतील नेहरू तारांगणाच्या धर्तीवर तारांगण उभारण्यात येत आहे. त्याचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्यास 15 कोटी रुपये खर्च आला आहे. तारांगण प्रकल्पाच्या बांधकामासाठी 14 कोटी 64 लाख 32 हजाराच्या  खर्चाच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने दोनदा मुदतवाढ दिली होती. , तर तिसर्‍यांदा केवळ एकच निविदा प्राप्त होऊन संबंधित ठेकेदाराकडून काम पूर्ण करून घेण्यात आले.  तारांगणाच्या बांधकामानंतर टुडीऑप्टो मेकॅनिकल यंत्रणा बसविणे, त्याची देखभाल-दुरुस्ती आणि प्रशिक्षित मनुष्यबळासह संचालन करणे आदी कामांसाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आमंत्रित करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती.

त्यासाठी अमेरिकेच्या गोटोइन्क प्लॅनेटेरियम प्रा. लि. कंपनीने निविदा सादर केली. यंत्रसामग्री व साहित्यासाठी कंपनीने 14 लाख 30 हजार 963 अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय चलनातील 9 कोटी 73 लाख 5 हजारे खर्च सादर केला होता. यंत्रसामग्रीची 5 वर्षांच्या कालावधीसाठी देखभाल व दुरुस्तीसाठी 80 लाख रुपये खर्च आहे. असे एकूण 10 कोटी 53 लाख 5 हजाराचा  खर्च होणार आहेत. या खर्चास स्थायीने मान्यता दिली आहे. 

तारांगणाचे काम दोन टप्प्यांत

अद्ययावत व अत्याधुनिक पद्धतीच्या तारांगणाचे काम दोन टप्प्यांत केले जाणार आहे. टप्पा एकमध्ये स्थापत्य व विद्युत विषयांचा आणि टप्पा दोनमध्ये तारांगणासाठी आवश्यक प्रोजेक्टर, आतील डोम आदी कामांचा समावेश आहे.