Sat, Nov 17, 2018 04:09होमपेज › Pune › संत तुकारामनगर, थेरगावात चारचाकी वाहनांची तोडफोड

संत तुकारामनगर, थेरगावात चारचाकी वाहनांची तोडफोड

Published On: Jan 09 2018 1:35AM | Last Updated: Jan 09 2018 1:16AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहराला वाहनाची तोडफोड आणि जाळपोळ करण्याची लागलेली कीड काही केल्या निघत नाही. सोमवारी पहाटे वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील थेरगाव आणि पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत संत तुकारामनगर येथे टोळक्याने वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवली आहे. दोन्ही घटनांत 18 वाहने फोडण्यात आली आहेत.  वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत थेरगाव येथील अशोका सोसायटी, आनंद हॉस्पिटल आणि मोरेश्‍वर कॉलनी या परिसरातील वाहनांची  तोडफोड करण्यात आली. दुचाकी, चारचाकी अशा सुमारे 10 ते 12 वाहनांची तोडफोड करून नुकसान करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री एक ते सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना  घडली आहे. 

वाकड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. टोळक्याने दोन टेम्पो ट्रॅव्हल, दोन मालवाहू टेम्पो, एक रिक्षा अन्य 5 प्रवासी वाहनांच्या काचा फोडल्या. रात्रीच्या वेळी दुचाकीवरून आलेल्या 5 ते 6 जणांच्या टोळक्याने ही तोडफोड केली असल्याचे तपासात समजत आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने तपास सुरू आहे.   पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत संत तुकारामनगर परिसरात अज्ञाताने सहा ते सात वाहनांची तोडफोड केली. राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवनाजवळ असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या ठिकाणी दारू पिण्यासाठी बसणार्‍या टोळक्याने ही तोडफोड केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ या घटना काही नव्या नाहीत. मागील वर्षात वारंवार अशा घटना घडल्या आहेत; मात्र यावर आळा बसवण्यात पोलिसांना अपयश आले आहे. यामुळे 2018 च्या सुरुवातीलाच पुन्हा टोळक्याने डोके वर काढून तोडफोड सत्र सुरू केले आहे.