Wed, Jul 24, 2019 12:30होमपेज › Pune › स्वयंपाकावेळी मोबाईल  व टीव्ही बघणे टाळा 

स्वयंपाकावेळी मोबाईल  व टीव्ही बघणे टाळा 

Published On: Mar 05 2018 1:57AM | Last Updated: Mar 05 2018 1:16AMपिंपरी : प्रतिनिधी 

आज मोबाईलवर बोलत किंवा टीव्हीवरील मालिका बघत बघत स्वयंपाक करण्याचे महिलांमधील प्रमाण खूप वाढले आहे. मात्र, महिलांची ही सवय संपूर्ण घरासाठीच धोकादायक ठरू शकते. कारण, मोबाईल किंवा टीव्ही पाहत स्वयंपाक करत असताना दुर्लक्ष होऊन आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महिलांनी मोबाईल आणि टीव्ही या दोन गोष्टी स्वयंपाकघरापासून दूर ठेवाव्यात, असे आवाहन सेफ किड्स फाऊंडेशनच्या अधिकार्‍यांनी केले आहे. 

सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर इंग्लिश व मराठी माध्यम शाळेत सेफ किड्स फाऊंडेशनच्या सहयोगाने ‘सेफ किड्स अ‍ॅट होम’ या उपक्रमांतर्गत शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे, शिक्षक आदी उपस्थित होते. 

फाऊंडेशनच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, महिला स्वयंपाक करताना मोबाईलवर बोलणे किंवा मोबाईलवरील रेसिपी पाहून भाजी करणे सुरु असते. तसेच, टीव्हीवरील मालिकेकडेही लक्ष असते. यामुळे दुर्लक्ष होऊन घरात आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महिलांनी स्वयंपाकघरात मोबाईल व टीव्हीपासून दूर राहावे. किचन कट्ट्यावर मोबाईल, चाकू, आगपेटी, तेलकट कापड ठेवणेही  जोखमीचे आहे. मुलांचा हात पोहोचणार नाही, अशा ठिकाणी काडीपेटी आणि लायटर ठेवावा. पाणी तापवायचा रॉड घातलेल्या बादलीपासून लहान मुलांना दूर ठेवावे. घराला आग लागल्यास काय खबरदारी घ्यावी, याबाबतही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.