Fri, May 24, 2019 08:27होमपेज › Pune › पिंपरीरोडच्या ‘पीएमपी’ बस ठरताहेत अनुपयोगी  

पिंपरीरोडच्या ‘पीएमपी’ बस ठरताहेत अनुपयोगी  

Published On: Dec 04 2017 1:36AM | Last Updated: Dec 04 2017 12:07AM

बुकमार्क करा

पिंपरी : नरेंद्र साठे

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानातून पिंपरीरोडच्या रिंगरोडच्या बस सोडण्यात येतात. मात्र, या मैदानावरील विस्कळीतपणामुळे नेहमीच बस थांबा बदलावा लागतो. त्याचबरोबर शहरातील कामगारांना एमआयडीसी पर्यंत जाण्यासाठी याठिकाणाहून रिक्षांचा आधार घ्यावा लागतो. कामगारांचे म्हणने आहे की, पुतळ्याच्या मागील मैदानावरून सोडण्यात येणार्‍या बस नेहरूनगरमधून सोडल्या तर कंपनीमध्ये जाण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे सध्या पिंपरीरोडच्या पीएमपीएमएलच्या बस अनुपयोगी ठरत असल्याचे कामगारांचे म्हणने आहे.

पीएमपीएमएल प्रशासनाकडून नेहमीच पिंपरी-चिंचवडसाठी कोणत्या ना कोणत्या कारणांनी वेगळी वागणूक मिळाली आहे. अनेकवेळा मागणी करून देखील त्यावर कुठलाच निर्णय घेतला जात नाही. या संदर्भात कामगारांनी पिंपरीतील पीएमपीच्या कार्यालयात विचारणा देखील केली होती. मात्र, त्यावर कुठलाच ठोस निर्णय झालेला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पाठीमागील महापालिकेच्या जागेत वारंवार विविध कार्यक्रम, सभा-समारंभांचे आयोजन करण्यात येते.

शिवाय या जागेवर अनधिकृतपणे अनेकवेळा अवजड तसेच कार पार्क केल्या जातात. यामुळे पीएमपीच्या चालकांना रस्त्याच्या बाजूला कुठेतरी बस उभा करावी लागते. या स्थानकावरून पिंपरी-चिंचवड वर्तुळाकार धावणार्‍या बस निघतात. या वर्तुळच्या बस नेहरूनगरपर्यंत घेऊन जाण्याची मागणी कामगार करत आहेत. नेहरूनगरला असलेल्या डेपोच्या ठिकाणी प्रशस्त जागा देखील आहे. शिवाय कामगारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून घ्यावा लागणारा रिक्षांचा सहार्‍याची देखील आवश्यकता भासणार नसल्याचे या कामगारांचे म्हणने आहे.

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी एमआयडीसी भागात अगोदरच बसच्या फेर्‍या खुप कमी आहेत. नेहरूनगरपर्यंत पिंपरीरोड येथील बस घेऊन जाणे शक्य असताना देखील केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शक्य होत नसल्याची खंत कामगार व्यक्त करत आहेत. 

पुर्ण प्रवासाला बदलव्या लागतात बस...

पीएमपीकडून मुद्दामहून महत्त्वाच्या ठिकाणी अपुर्ण सुविधा दिली जाते, यामुळे पीएमपीला जास्त फायदा होत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. वडगाव ते मनपा अशी सुविधा करण्याची अनेक दिवसांची मागणी आहे, मात्र मावळातील नागरिकांना निगडी पर्यंतच बस सुविधा आहे. तेथून पुढे बस बदलावी लागते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून पुढे थेट एमआयडीसी भागात बस सुविधा सुरू करण्याची आवश्यकता आहे, जेणे करून नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचेल.