Thu, Apr 25, 2019 05:28होमपेज › Pune › ‘पोल्युशन क्‍लिनर’चा अनोखा शोध

‘पोल्युशन क्‍लिनर’चा अनोखा शोध

Published On: Feb 04 2018 1:56AM | Last Updated: Feb 04 2018 12:10AMपिंपरी  प्रतिनिधी

दिवसेंदिवस शहराचा विकास झपाट्याने होत असून, वायुप्रदूषणाचे प्रमाणही वाढत आहे. यामुळे विविध आजार उद्भवत आहेत. सर्वाधिक प्रदूषित शहरांत पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहराचाही समावेश झाला असून, प्रदूषणावर उपाय म्हणून मोरवाडी, पिंपरी येथील राहुल गुरव या मेकॅनिकल इंंजिनिअरिगच्या विद्यार्थ्याने प्रदूषण नियंत्रण करणार्‍या पोल्युशन क्‍लिनर उपकरणाचा शोध लावला आहे. याचे पेटंटही राहुलला मिळाले असून, यामुळे शहरातील प्रदूषित हवा स्वच्छ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा राहुलने व्यक्त केली आहे. 

शहरातील रस्त्यांच्या दुभाजकांवर हे उपकरण बसवल्यास दोन्ही बाजूने चालणार्‍या वाहनांतून बाहेर पडणारे  प्रदूषित घटक शोषून  येऊन वातावरणात शुद्ध हवा सोडण्यासाठी हे उपकरण उपयुक्त ठरेल. हे उपकरण विजेवर; तसेच सौरऊर्जेवरही चालू शकते; तसेच वेगवेगळ्या कारखान्यांतून निर्माण होणार्‍या प्रदूषणालाही यामुळे प्रतिबंध घालता येईल, असा दावा राहुलने केला आहे.