Fri, Jul 19, 2019 22:00होमपेज › Pune › प्लास्टिकबंदीबाबत पिंपरी पालिका अजूनही सुस्तच

प्लास्टिकबंदीबाबत पिंपरी पालिका अजूनही सुस्तच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तू वापरण्यास राज्य शासनाचे गुढीपाडव्यास (दि.18) बंदी घातली आहे. ती वापरणे, विक्री करणे आणि उत्पादन केल्यास शिक्षेची तरतूद केली आहे. याबाबत महिन्याभरात कारवाई करून शहरातील दुकानदार व उत्पादकांकडून प्लास्टिकची विल्हेवाट लावण्याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र, आठवडा उलटूनही, अद्याप पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. 

राज्य शासनाने प्लास्टिकबंदी जाहीर केल्यानंतर त्याची कडक व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास पालिकेने अद्याप सुरुवात केलेली नाही. त्यामुळे शहरात सर्रासपणे प्लास्टिक व थर्माकोल वस्तूची विक्री सर्वत्र होत आहे. नागरिकही बिनदिक्कतपणे प्लास्टिकचा वापर नेहमीप्रमाणेच करीत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत पूर्वीपासूनच 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगवर कारवाई केली जात आहे. मात्र, कारवाईचे हे प्रमाण नगण्य आहे. 

शासनाने अध्यादेश जाहीर करून करून आठवडा उलटला आहे. मात्र, तो अद्याप पालिकेस मिळाला नसल्याचे उत्तर देत अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत. मात्र, सदर अध्यादेश नुकताच पालिका प्रशासनाला मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. शासनाच्या या निर्णयावर पुणे पालिकेने तातडीने कारवाईस सुरुवात केली आहे. मात्र, ढिम्म पिंपरी- चिंचवड पालिका प्रशासन काहीच हालचाली करीत नसल्याचे चित्र आहे. 

सदर अध्यादेशानुसार शहरात पूर्णपणे प्लास्टिकबंदीची अंमलबजावणीसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे. दुकानदार, विक्रेते आणि उत्पादकांना माहिती देऊन त्यांना सूचना देणे. जनजागृती मोहिमेतूनही प्रतिसाद न दिल्यास दंडासह शिक्षेची कारवाई करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण कारवाई महिन्याभरात पूर्ण करून शासनाला अहवाल पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, अद्याप पालिकेने या संदर्भात कार्यवाही केली नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.

तसेच, या कार्यवाहीसाठी जबाबदार अधिकार्‍यांची नियुक्तही करण्यात आलेली नाही. दरम्यान, शासनाने शनिवारी (दि.24) यासंदर्भात अधिसूचनाही लागू केली आहे. त्यानुसार नियमांचे उल्लंघन केल्यास 5 ते 25 हजार रुपये दंड आणि 3 महिने कारावासाची शिक्षा होऊ शकते.  

 

 

 

tags : Pimpri,news,Plastic, ban,in Pimpri,Chinchwad, Municipality,


  •