Sun, Apr 21, 2019 00:06होमपेज › Pune › खोदलेले रस्ते बुजविण्याच्या कामात धूळफेक 

खोदलेले रस्ते बुजविण्याच्या कामात धूळफेक 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी  : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यांवर पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजविण्यासाठी तब्बल 8 कोटी 32 लाख 41 हजार 772 रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र, संबंधित निविदा प्रक्रिया ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने खासगी कंपन्या व पालिकेने भूमिगत वाहिन्यांसाठी खोदलेले रस्ते बुजविण्यासाठी काढण्यात आल्याचा उल्लेख स्थायी समितीच्या विषयपत्रिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात खोदून ठेवलेले रस्ते व पदपथ दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदार करणार नाही. स्थापत्य विभागाकडून धूळफेक करणारा हा विषय मंजुरीसाठी ‘स्थायी’च्या बुधवारच्या (दि.28) सभेपुढे ठेवण्यात आला आहे.  

विविध खासगी कंपन्या व पालिकेच्या सेवावाहिन्या टाकण्यासाठी शहरभरात रस्ते खोदलेले रस्ते दुरुस्त करणे या शीर्षकाखाली ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत जेट मशिनने अद्ययावत पद्धतीने पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येणार आहेत. या कामासाठी राष्ट्रीयस्तरावर मटेरिअल व क्वाँटिटीनुसार निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रतिसाद न मिळाल्याने दुसर्‍यांदा 2 डिसेंबर 2017ला निविदा उघडण्यात आली. त्यात अंजली लॉजिस्टिक यांची 8 कोटी 32 लाख 41 हजारांची, एसटीजी इन्फ्रा प्रा. लि.ची 9 कोटी 6 लाख 77 हजार आणि आकांक्षा बिल्डर्सची 9 कोटी 3 लाख 29 हजार खर्चाची निविदा प्राप्त झाली. अंजली लॉजिस्टिकची निविदा स्वीकारण्यात आली. 

या कामाचा कालावधी 36 महिने आहे. त्यामध्ये पावसाळ्यातील 4 महिने असे केवळ  12 महिनेच जेट मशिनने शहरातील खड्डे बुजविले जाणार आहेत. संपूर्ण शहरासाठी केवळ दोनच मशिन ठेकेदार वापरणार आहे. या कामास मंजुरी देण्यासाठी सदर विषय स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. गेल्या (दि.21) च्या सभेत हा विषय तहकूब ठेवण्यात आला होता. पुन्हा तो विषय बुधवारच्या सभेपुढे ठेवण्यात आला आहे. 

सदर ठेका केवळ पावसाळ्यातील खड्डे बुजविण्यासाठी असल्याने सध्या शहरभरात पडलेले खड्डे कोण बुजविणार, यासंदर्भात पालिका प्रशासन काहीच कार्यवाही करीत नसल्याचे दिसत आहे. पदपथही खोदून पेव्हिंग ब्लॉक फेकून दिले आहेत. त्यामुळे सुंदर शहर विद्रूप झाले आहे. खोदलेल्या रस्ते व पदपथांमुळे नागरिकांना ये-जा करणे गैरसोईचे ठरत आहे.  सर्वत्र पसरलेल्या पेव्हिंग ब्लॉकमुळे पादचार्‍यांना पायी चालणेही अवघड होऊन बसले आहे. सर्व शहरातील रस्ते व पदपथ तातडीने दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या संदर्भात ‘पुढारी’ने वारंवार छायाचित्रांसह वृत्त प्रसिद्ध केले आहे. मात्र, पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. 
 


  •