Sat, Mar 23, 2019 12:41होमपेज › Pune › वाढीव निधीस फाटा देत  प्रत्यक्ष खर्चानुसारच तरतूद

वाढीव निधीस फाटा देत  प्रत्यक्ष खर्चानुसारच तरतूद

Published On: Jan 09 2018 2:04AM | Last Updated: Jan 09 2018 1:55AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2017-18 वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू असून, तो 10 फेबु्रवारीपर्यंत सादर करण्याचे उद्दिष्ट लेखा विभागाचे आहे. त्यानंतर अर्थसंकल्प छपाईस दिला जाईल. प्रत्यक्ष खर्चापेक्षा अधिक रकमेची तरतूद करण्यास मनाई केल्याने यंदा अर्थसंकल्प केवळ 5 ते 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. चालू व नव्या वर्षाचे अर्थसंकल्प तयार करण्याचे काम महापालिकेच्या लेखा विभागाकडून चालू आहे. त्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांकडून विविध कामांच्या निधी तरतुदीची माहिती मागविली आहे. त्यास विभागप्रमुखांकडून समाधानकारक प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. आयुक्तांनी विभागप्रमुखांना सक्त ताकीद देऊन तत्काळ माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. 

सध्या महसुली अर्थसंकल्प तयार करण्याचे काम अंतिम टप्पात आहे. शहरातील वाढीव बांधकामांनुसार मिळकतकर व पाणीपट्टीत; तसेच बांधकाम परवाना शुल्कात वाढ होणार आहे. ‘जीएसटी’चा निधी ठरल्याप्रमाणे मिळणार आहे. त्यात 5 ते 10 टक्के वाढ अपेक्षित आहे. पुढील महिन्यात 10 तारखेपर्यंत अर्थसंकल्प तयार करून तो आयुक्तांच्या शिफारशीसह  स्थायी समिती सभेपुढे मांडला जाईल. मार्चच्या 31 तारखेपूर्वी तो सर्वसाधारण सभेकडून मंजूर होईल, असे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी सांगितले. अर्थसंकल्पात नव्याने शिस्त लावल्याने यंदा निधीत फुगवटा दिसणार नाही. परिणामी, निधी योग्य विकासकामांवर खर्ची होईल. त्यामुळे अर्थसंकल्पाची पानेही कमी होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.