Sun, Aug 25, 2019 12:18होमपेज › Pune › पीएमपी’शी पत्रव्यवहार करायचाय तर पुण्यात जा

पीएमपी’शी पत्रव्यवहार करायचाय तर पुण्यात जा

Published On: Feb 07 2018 1:47AM | Last Updated: Feb 07 2018 12:25AMपिंपरी : नरेंद्र साठे

पिंपरी-चिंचवडकरांसाठी पीएमपीएमएलचे नारायण मेघाजी लोखंडे भवनमध्ये असलेले विभागीय कार्यालय बंद करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यासंदर्भात ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी ‘पीएमपी’ प्रशासनाकडे मागणी  करूनदेखील ‘पीएमपी’ प्रशासनाकडून पिंपरीकरांच्या सोईसाठी कार्यालय सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू नसल्याची माहिती सूत्रांकडून समजली. लोखंडे भवनमध्ये असलेल्या विभागीय कार्यालयाला सध्या टाळे ठोकण्यात आले आहे. येथील विभागप्रमुख आणि लिपिक यांची बदली केली आहे.  त्यानंतर काही दिवस एक व्यक्ती कार्यालयात कार्यरत होती, तर सध्या कार्यालयाला टाळे ठोकले आहे.  

मुख्य कार्यालयाच्या छताखालूनच सर्व कामकाज चालावे याकरिता पिंपरीतील विभागीय कार्यालय बंद केल्याचे  सांगितले जाते. येथे असलेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्या करून त्यांना त्यांच्या मूळ पदावर नियुक्त केले आहे. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार पिंपरीमध्ये ‘पीएमपी’ विभागीय कार्यालय 2007 च्या दरम्यान सुरू केले होते. यामुळे ‘पीएमपी’संदर्भातील सर्व माहिती या विभागीय कार्यालयातून शहरवासीयांना मिळत होती. याचबरोबर पिंपरी महापालिकेलादेखील पत्रव्यवहार करताना कार्यालयामुळे सोपे जात होते. शहरातील लोकप्रतिनिधी त्यांची तक्रार, सूचना घेऊन विभागीय कार्यालयात अधिकार्‍यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रश्‍न सोडवून घेत असत; परंतु आता लोकप्रतिनिधींना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी थेट व्यवस्थापकीय संचालकांचीच भेट घ्यावी लागणार किंवा स्वारगेटमधील अधिकार्‍यांना भेटण्यास जावे लागणार आहे. तीच परिस्थिती नागरिकांचीदेखील होणार आहे.

यासंदर्भात महापौरांसह इतर लोकप्रतिनिधींनी ‘पीएमपी’ प्रशासनाशी कार्यालय सुरू करण्यासंदर्भात पाठपुरावा केला; परंतु त्याचा अद्याप काही फायदा झाला नाही. विलीनीकरणानंतर पुण्यातील भेकराई, शेवाळवाडी, बालेवाडी या ठिकाणी नवीन बस डेपो झाले. पिंपरीसाठी मात्र नेहरूनगर, निगडी आणि भोसरी असे तीनच डेपो आहेत; शिवाय होते ते विभागीय कार्यालयदेखील ‘पीएमपी’ प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतल्याने पिंपरी-चिंचवडकरांना नेहमीच वेगळी वागणूक मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांच्या वाढीबरोबरच उपनगरे वाढत आहेत; मात्र पिंपरी-चिंचवडला पीएमपीएमएलच्या बसेसची अपुरी संख्या व अवघे तीन डेपो यामुळे प्रवाशांना जलद व सुखकर सुविधा मिळत नाही.