Mon, Aug 19, 2019 11:32होमपेज › Pune › ‘पीएमपी’ ने प्रवास नको रे बाबा

‘पीएमपी’ ने प्रवास नको रे बाबा

Published On: Feb 14 2018 2:55AM | Last Updated: Feb 14 2018 1:19AMपिंपरी :  प्रदीप लोखंडे

शहरामध्ये ‘पीएमपी’च्या  बसला आग लागण्याची घटना नुकतीच घडली. यासह सातत्याने बसमध्ये बिघाड होण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, ‘पीएमपी’चा प्रवासही असुरक्षित झाला आहे. त्यामुळे ‘पीएमपी’चा प्रवास नको रे बाबा,’ अस म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. ‘पीएमपी’च्या समस्यांमध्ये सातत्याने वाढ आहे.  बस जळण्याचे हे प्रकार तांत्रिक कारणामुळे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. अनेक बसेस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. नुकतीच पिंपरी येथे देखील बस जळण्याची घटना घडली.

या जळणार्‍या बसेसमध्ये आतापर्यंत जीवितहानी झालेली नाही. अजूनही पीएमपीएमएल प्रशासनाला जाग आली नसल्याचे चित्र आहे. बस जळूनही सत्ताधार्‍यांसह विरोधकही शांत असल्याने प्रवाशांची अस्वस्थता वाढली आहे. लागोपाठ घडलेल्या जळीत प्रकरणांची योग्य ती चौकशी होण्याची गरज आहे. यामध्ये सार्वजनिक मालमत्तेची मोठी हानी होत असून, प्रवाशांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे.पीएमपीच्या अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. अपघातांचे हे सत्र थांबत नाही तोच बस जळण्याचे सत्र सुरू झाल्याने प्रवाशांच्या उरात धडकी भरली आहे.

बसचा प्रवास दिवसेंदिवस धोकादायक होत असल्याची भावना प्रवाशांच्या मनात आहे. पीएमपीच्या अनेक नादुरुस्त बसेस सद्यःस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये प्रवासी वाहतूक करत आहेत. या बसेस म्हणजे प्रवाशांसाठी साक्षात काळच असल्याचे चित्र आहे. कधी अपघात घडेल हे सांगता येत नाही. त्यातच बेजबाबदार चालकांमुळेही अनेक अपघात सातत्याने घडत आहेत. आयुर्मान संपलेल्या अनेक बस बेकायदेशीरपणे रस्त्यावर चालवून पीएमपीएमएल वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत आहे.