Wed, Jul 17, 2019 20:29होमपेज › Pune › चिंचवडमध्ये एक गाव एक शिवजयंती

चिंचवडमध्ये एक गाव एक शिवजयंती

Published On: Feb 27 2018 1:57AM | Last Updated: Feb 27 2018 1:43AMपिंपरी : प्रतिनिधी 

श्री काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने चिंचवडमध्ये ‘एक गाव, एक शिवजयंती’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत 4 मार्च  रोजी मिरवणूक काढण्यात येणार असून, यामध्ये तानाजी मालुसरे, येसाजी कंक, खंडेराव दाभाडे, व्यंकोजी शिरोळे यांचे वंशज सहभागी होणार आहेत.  मागील तीन वर्षांपासून श्री काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने अखिल चिंचवडगाव शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात येतो. यामध्ये रविवारपासून (दि. 25) शिव व्याख्यानमालेला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (दि. 3) पर्यंत शिवव्याख्यानमाला सुरू राहणार आहे. दररोज सायंकाळी सात वाजता ही व्याख्याने होणार आहेत. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प नीलेश गावडे यांनी ‘गड किल्ले महाराष्ट्राचे’ या विषयाने, तर दुसरे पुष्प श्रीहरी तापकीर यांनी ‘दक्षिणस्वारी’ या विषयाने गुंफले. 

मंगळवारी(दि. 27) पागेची तालीम येथे ‘मर्यादेय विराजते’ या विषयावर श्रीनिवास कचरे, बुधवारी (दि. 28) काकडे पार्क चौक येथे राहुल कराळे यांचे ‘ऐसा राजा होणे नाही’, गुरुवारी (दि. 1 मार्च) दळवीनगर चौकात भूषण शिंदे यांचे ‘पराक्रमी मराठे’, शुक्रवारी (दि. 2) वाल्हेकरवाडी चौकात प्रशांत लवटे यांचे ‘पराक्रमापलीकडील शिवराय’ या विषयावर व्याख्यान होईल, तर शुक्रवारी चापेकर चौकात मालोजी जगदाळे यांच्या ‘छत्रपती थोरले शाहू’ या विषयावरील व्याख्यानाने व्याख्यानमालेचा समारोप होईल. 

शनिवारी (दि. 4) श्री काळभैरवनाथ मंदिर येथे दुपारी बारा वाजता शिवछत्रपतींचा जन्मोत्सव साजरा करण्यात येईल. याच दिवशी दुपारी चार वाजता श्री शिवछत्रपतींचा पालखी सोहळा काढण्यात येईल; तसेच 14  फूट उंचीच्या सिंहासनावर आरूढ शिवरायांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येईल. पारंपरिक वाद्ये, मर्दानी खेळ, घोडे, वारकरी पथक, बैलगाडा, पालखी, पोतराज, हलगी वादन, ढोल-ताशा पथक असे मिरवणुकीचे स्वरूप असणार आहे. मिरवणुकीमध्ये  शिवरायांच्या घोडदळातील प्रमुख सरदार असलेले तानाजी मालुसरे, येसाजी कंक, खंडेराव दाभाडे, व्यंकोजी शिरोळे यांचे वंशज सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली.