Wed, Apr 24, 2019 19:31होमपेज › Pune › एसटीच्या कर्मचार्‍यांना मिळणार नवीन गणवेश

एसटीच्या कर्मचार्‍यांना मिळणार नवीन गणवेश

Published On: Jan 06 2018 1:40AM | Last Updated: Jan 06 2018 1:09AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

गेली काही दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांचा गणवेश बदलणार असल्याची चर्चा होत आहे. प्रशासकीय पातळीवर सर्व सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर पुढील आठवड्यात एसटी कर्मचार्‍यांना नवीन ड्रेस मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली. चालक-वाहकांसह अन्य कर्मचार्‍यांना एसटी महामंडळाकडून नवीन गणवेश दिला जाणार आहे. जवळपास 16 विविध पदांच्या एक लाखाहून अधिक कर्मचार्‍यांना नवीन गणवेश मिळेल. महत्त्वाची बाब म्हणजे चालक-वाहकांच्या नव्या गणवेशांवर रेडियमच्या दोन पट्ट्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मार्गावर असतानाच एखादी बस रस्त्यात बिघडल्यास किंवा अपघात झाल्यास रात्री-अपरात्री अन्य वाहनचालकांना अंधारातही एसटीचे चालक दिसू शकतील. 

एसटीचे चालक, वाहक, शिपाई, यांत्रिकी, तांत्रिक, हेल्परसह सर्व कर्मचार्‍यांना याआधी गणवेशासाठी कापड आणि शिलाईभत्ता दिला जात होता; मात्र कपड्याचा दर्जा योग्य नसल्याच्या तक्रारी कर्मचार्‍यांकडून केल्या जात होत्या. त्याची दखल घेत अखेर एसटी कर्मचार्‍यांना तयार गणवेशच देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्राच्या एनआयएफटीकडून (नॅशनल इन्स्टिट्यूट फॅशन टेक्नॉलॉजी) एसटीच्या कामगार वर्गासाठी गणवेशाचे डिझाईन तयार केले जात होते.