Fri, Jun 05, 2020 01:31होमपेज › Pune › राष्ट्रवादीत आलेली मरगळ काही जाईना

राष्ट्रवादीत आलेली मरगळ काही जाईना

Published On: Feb 14 2018 2:55AM | Last Updated: Feb 14 2018 1:22AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत दारूण पराभव झाल्याने  राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये व कार्यकर्त्यांत आलेले नैराश्य अद्याप कायम आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शहरात आले की, पक्षात चैतन्य निर्माण झाल्यासारखे वाटते; मात्र एरवी जनसामान्यांच्या प्रश्‍नांवर होणार्‍या आंदोलनांकडे फारसे कोणी फिरकत नाहीत, त्यामुळे हा पक्ष लोकसभा, विधानसभा निवडणुकांना प्रभावीपणे सामोरा कसा जाणार, हा प्रश्नच आहे.

महापालिकेत पंधरा वर्षे सत्ता गाजविलेल्या राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीपासून गळती लागली. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे असे दिग्गज नेते भाजपला जाऊन मिळाल्याने राष्ट्रवादी खिळखिळी झाली. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत लक्ष घातल्याने राष्ट्रवादीपुढे आव्हान निर्माण झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादीने सत्तेत असताना केलेल्या विकासकामांवरच मते मागितली, तर विकासकामांच्या नावाखाली राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपने केला. या निवडणुकीत 128 पैकी 77 जागा जिंकून भाजपने निर्विवाद बहुमत मिळविले, तर राष्ट्रवादीला 36 जागा मिळाल्या.

विरोधी पक्षनेतेपदी योगेश बहल यांची वर्णी लागल्याने नाराज झालेल्या ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांनी बंडाची भाषा केली. त्याच त्याच व्यक्तींना पदे दिल्याने पक्षाचे नुकसान होत आहे, असे सांगत त्यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह राजीनाम्याचा इशारा दिला. पुढे हे वादळ शांत झाले.  सत्तेत असताना प्रचंड विकासकामे करूनही पालिका निवडणुकीत जनतेने  विरोधात कौल दिल्याने राष्ट्रवादीत  नैराश्य निर्माण झाले. पक्षाचे नेते अजित पवार यांनीही शहराकडे पाठ फिरवली. क्वचितच ते शहरात आले. नैराश्य झटकून त्यांनी  सप्टेंबरमध्ये  शहराचा दौरा केला व पालिका प्रशासनाची झाडाझडती घेतली. शहरातील प्रलंबित प्रश्‍नांचा आढावा घेतला.

राष्ट्रवादीची सत्ता असताना भूमिपूजन झालेल्या विकासकामांची सद्यःस्थिती जाणून घेतली. पत्रकार परिषदेत भाजपवर तोफ डागली. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या मंडळींचा समाचार घेतला, त्यामुळे पक्षात चैतन्य निर्माण झाले; मात्र अजित पवार आले तरच तोंड दाखवायला यायचे, अशी पक्षाच्या स्थानिक नेते, कार्यकर्ते, नगरसेवक यांची धारणा झाल्याने जनसामान्यांच्या प्रश्‍नांवरील आंदोलनाकडे ते फिरकतही नाहीत. महापालिकेत राष्ट्रवादीचे नगरसेवक, त्यांच्या नातेवाईकांचे ठेके असल्याने भाजपला विरोधास ते धजावत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. 

याबाबत अजित पवार यांना तहसील कार्यालयावरील मोर्चाच्या वेळी पत्रकारांनी छेडले तेव्हा, ‘आम्ही 15 वर्षे सत्तेत होतो, विरोधाची सवय एका दिवसात लागणार नाही. मला स्वतःला निवडणुकीनंतर इथे यायला दोन महिने लागले. विकासकामे करूनही जनतेने चुकीचा कौल दिेल्याने वाईट वाटणारच; मात्र आमचे लोक चुकीच्या कामांना विरोध करत आहेत. भाजपने लोकशाहीचा गळा घोटत बजेट एका मिनिटात मंजूर केले. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे निलंबन केले. त्याविरोधातही आम्ही आवाज उठवला,’ असे सांगत पवार यांनी स्थानिक नेतृत्वाची पाठराखण केली, त्यामुळे स्थानिक नेते  चांगलेच सुखावले.

मात्र, सत्ता असताना अजित पवार ज्या भाषेत स्थानिक नेते, पदाधिकार्‍यांना ठणकवायचे  तसे आता बोलत नाहीत, हे जाणून स्थानिक नेते सुस्तावले आहेत. पालिका निवडणूक झाल्याने कोणालाच आंदोलने, पक्षवाढीत रस दिसत नाही. आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांचा चहापाण्याचा खर्च कोण करत बसणार, म्हणून नेते, नगरसेवक एकेकटे आंदोलनात सहभागी होत आहेत. तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा असाच अतिशय ‘पूअर शो’ ठरला. पक्षात 
अशी मरगळ आल्याने हा पक्ष लोकसभा, विधानसभा निवडणुकीला सामोरा कसा जाणार हा प्रश्‍नच आहे.