Sat, Sep 22, 2018 22:35होमपेज › Pune › राष्ट्रीय बचतपत्रांचे  काम मुदतीपूर्वीच ‘स्टॉप’

राष्ट्रीय बचतपत्रांचे  काम मुदतीपूर्वीच ‘स्टॉप’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी  ; प्रतिनिधी

राष्ट्रीय बचतपत्रांचे काम पिंपरी गावातील पोस्ट ऑफिसमध्ये बुधवारी (दि. 28) दुपारी बारा वाजताच  ‘स्टॉप’ करण्यात आले. पुढे 31 मार्चपर्यंत सलग सुट्या आल्याने प्राप्तिकरात कलम 80 अंतर्गत सूट मिळविण्याच्या नागरिकांच्या प्रयत्नास यामुळे खीळ बसली. या वर्षी नोकरदारांसाठी प्राप्तिकर मर्यादा अडीच लाख आहे. त्यापुढील उत्पन्नावर कर भरावा लागत असल्याने, कलम 80 अंतर्गत यात वजावट मिळावी यासाठी लोक विमा, पोस्टाची एनएसएस अर्थात नॅशनल सेव्हिंग सेर्टिफिकेट यात गुंतवणूक करतात. अशी गुंतवणूक करताना अनेक जण मार्चच्या शेवटच्या आठवड्याची वाट पाहतात; मात्र अशी गुंतवणूक करायला गेलेल्या लोकांची या वेळी पोस्ट खात्याने निराशा केली.

पिंपरी गावातील पोस्ट ऑफिसमध्ये बुधवारी (दि. 28) दुपारी 2 वाजता राष्ट्रीय बचत पत्र खरेदी करण्यास गेलेल्या ग्राहकांना दुपारी बारा वाजताच आम्ही हे काम थांबविले असल्याचे उत्तर पोस्टातील संबंधित कर्मचार्‍याने दिले आणि आता उद्यापासून महावीर जयंती (दि 29), गुड फ्रायडे (दि 30 ), मार्च इअर एडिंग (दि 31)  अशा सलग सुट्या असल्याने 1 एप्रिललाच राष्ट्रीय बचतपत्र घेता येईल, असेही सांगितले.

यावर दुसरा काही पर्याय नाही का, असे ग्राहकांनी विचारले असता रोख रक्कम, ‘केवायसी’साठी लागणारी कागदपत्रे व फोटो घेऊन तातडीने पुण्यात ‘जीपीओ’मध्ये गेलात, तर कदाचित काम होऊ शकते, असे उत्तर दिले गेले; पण पिंपरीतच दिवे लागले, तर पुण्यात जाऊन तरी काम होणार का, असा विचार करत ग्राहकांनी पोस्टाची संगत नको रे बाप्पा म्हणत नादच सोडून दिला. स्पर्धा वाढली आहे. पोस्ट खाते कालबाह्य होत चालले आहे, तरी पोस्ट खात्याचा कारभार मात्र सुधारायला तयार नसल्याचा संताप ग्राहकांनी व्यक्त केला.
 


  •