Wed, Jul 24, 2019 02:02होमपेज › Pune › क्षेत्रीय कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे द्या

क्षेत्रीय कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे द्या

Published On: Jan 02 2018 1:51AM | Last Updated: Jan 02 2018 12:49AM

बुकमार्क करा
पिंपरी : वार्ता 

पालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या आठ क्षेत्रीय कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे देण्यात यावीत, अशी सूचना भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले असून, आयुक्तांनी प्रभाग कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे देण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेची आठ प्रशासकीय कार्यालये लवकरच गडकिल्ल्यांच्या नावाने ओळखली जाणार आहेत.

आमदार जगताप यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी 1997 मध्ये चार प्रभाग कार्यालयांची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी 2012 मध्ये कामकाजाच्या विकेंद्रीकरणासाठी आणखी दोन प्रभाग कार्यालयांची निर्मिती करून त्यांना क्षेत्रीय कार्यालय संबोधण्यास सुरुवात केली; मात्र फेब्रुवारी 2017 मध्ये चार सदस्यीय पद्धतीने महापालिका निवडणूक झाली. त्यानुसार 32 निवडणूक प्रभाग झाले आहेत.

ही प्रभागरचना होत असताना पूर्वीच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत बदल झाले, त्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा येऊ नये; तसेच नागरी सुविधा पुरविणे सोयीचे व्हावे यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना करून आठ कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. ही नवीन आठ क्षेत्रीय कार्यालये क्रांतिदिनापासून म्हणजे 9 ऑगस्ट 2017 पासून अस्तित्वात आली आहेत. या क्षेत्रीय कार्यालयांना नावे देणे जिकिरीचे बनल्यामुळे प्रशासनाने कामकाजाच्या सोईसाठी ‘अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह’ अशी नावे दिली आहेत. क्षेत्रीय कार्यालयांना नावे नसल्यामुळे नागरिकांचाही गोंधळ उडत आहे. त्यामुळे या कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे दिल्यास ते नागरिकांना सहज लक्षात ठेवता येईल.

त्यानुसार ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाला पन्हाळगड, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाला पुरंदर, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाला सिंहगड, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाला रायगड, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाला शिवनेरी, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाला देवगिरी, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाला सिंधुदुर्ग आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाला प्रतापगड हे नाव देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली आहे.