Sun, Sep 23, 2018 22:23



होमपेज › Pune › बिलांवरून ठेकेदार व सुरक्षारक्षकांमध्ये वाद

बिलांवरून ठेकेदार व सुरक्षारक्षकांमध्ये वाद

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





पिंपरी ; प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेची विविध विकासकामे करणार्‍या ठेकेदार, पुरवठादारांची चालू 2017-2018चे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी सर्व प्रकारची बिले 28 मार्चच्या रात्री बारापर्यंत लेखा विभागाकडे सुपूर्द करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आलेली बिले स्वीकारण्यात येणार नसल्याने, बिले सादर करण्यासाठी ठेकेदार व पुरवठादारांमध्ये धावाधाव सुरू आहे. बुधवार (दि. 28) या अखेरच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये बिले सादर करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे  लेखा विभागाला सुरक्षाकवच उपलब्ध करून देण्यात आले आहे. कार्यालयात सोडण्यासाठी सुरक्षारक्षक आणि ठेकेदारांमध्ये वाद होत असल्याचा घटनांत वाढ झाली आहे. 

पालिकेच्या विविध विभागांमार्फत विकासकामे केली जातात. ‘मार्च एण्ड’ला सुमारे 300 ते 350 कोटी रुपयांची बिले अदा केली जातात. ठेकेदार व पुरवठादारांनी केलेल्या कामांची बिले वेळेवर काढण्याची जबाबदारी पालिका भवनातील तळमजल्यावरील लेखा विभागावर आहे. बिले तयार करण्यापूर्वी उपअभियंता किंवा कनिष्ठ अभियंता, लेखाधिकारी ही बिले लेखा विभागात तपासणीसाठी पाठवितात. मात्र, वेळोवेळी सूचना देऊनही त्याचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. त्यामुळे तेच तेच आक्षेप पुन्हा उपस्थित होऊन लेखा विभागाकडून बिले परत पाठविली जातात.

गेल्या वर्षी 31 मार्चनंतर ठेकेदारांची बिले स्वीकारली गेली नाहीत. सुमारे 160 कोटी रुपयांची बिले लेखा विभागाने रोखून धरली होती. सत्ताधारी भाजप पदाधिकार्‍यांनी ठेकेदारांची बिले अडवून ‘पठाणी वसुली’ केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. बिले मंजुरीसाठी टक्केवारी मागितली जात असल्याची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयाच्या ‘वेबपोर्टल’वर करण्यात आली होती. या तक्रारीमुळे शहरात वादंग निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर यंदा दोन महिने अगोदरपासूनच आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दक्षता घेतली आहे.

प्रत्येक बिलासोबत ठेकेदारांनी त्या कामावर नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांची यादी आणि त्यांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ)  भरणा केल्याची चलने फाईलमध्ये समाविष्ट केल्यानंतरच उपअभियंत्याने बिल देण्याची शिफारस करावी. ‘पीएफ’चा भरणा केला नसल्यास बिल पूर्ततेसाठी पाठवू नये. अगोदर 23 मार्चपर्यंतच बिले स्वीकारली जातील, असे परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले होते. मात्र, दबाव वाढल्याने आणि ‘पुढारी’ने दिलेल्या वृत्तांची दखल घेऊन बिले सादर करण्याची अंतिम मुदत 5 दिवसांनी वाढवून ती 28 मार्च रात्री बारापर्यंत करण्यात आली आहे. बिले सादर करण्यास केवळ अखेरचा एक दिवस शिल्लक असल्याने ठेकेदार आणि पुरवठादारांची बिले सादर करण्याची धावाधाव सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर लेखा विभागाला गेल्या वर्षीप्रमाणे सुरक्षारक्षक पुरविण्यात आले आहेत. ठेकेदार व पुरवठादारांना कार्यालयात सोडण्यासाठी सुरक्षारक्षकांसोबत वादाचे प्रकार घडत आहेत. 
 






  •