Mon, Apr 22, 2019 11:39होमपेज › Pune › पिंपरी महापालिकेला पंपिंग स्टेशनसाठी हवी देहूत जागा

पिंपरी महापालिकेला पंपिंग स्टेशनसाठी हवी देहूत जागा

Published On: Mar 22 2018 1:45AM | Last Updated: Mar 22 2018 1:06AMदेहूरोड : उमेश ओव्हाळ

पवना धरणातून थेट बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी पिंपरी-चिंचवड शहराला नेण्याचा प्रयत्न अडचणीत सापडल्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आता इंद्रायणीतून पाणी उचलण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी सुदूंबरेजवळ इंद्रायणीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍यातून आंद्रा व भामा आसखेड धरणांतून पाणी उचलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बोडकेवाडी येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलउपसा योजना असून, त्याशेजारी मोकळी जागा उपलब्ध आहे. या जागेची मागणी पालिकेने पत्राद्वारे केली आहे.

देहू ग्रामपंचायत हद्दीतील बोडकेवाडी येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून नवीन पाणी योजना उभारण्यात आली असून, ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे कार्यान्वित करण्यात आली आहे. 

या योजनेलगत प्राधिकरणाची मोकळी जागा आहे. या जागेवर पिंपरी-चिंचवडसाठी पाणी उपसा करणारी योजना उभारण्याचा पालिकेचा मानस असल्यामुळे या जागेची मागणी पालिकेने प्राधिकरणाकडे केली आहे. यासंदर्भात 14 डिसेंबर 2017 रोजी प्राधिकरण आणि पालिका अधिकार्‍यांची बैठक झाली होती.  या बैठकीचा आधार गेत ही मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने आंद्रा व भामा-आसखेड धरणांतून पालिकेसाठी 97. 661 दसलक्ष घनमीटर इतकापाणी कोटा पालिकेला 2014 मध्येच मंजुर केला असून याबाबतचा शासन निर्णयही पालिकेने कळविला आहे.

या योजनेनुसार भामा-आसखेड धरणातून मुख्य जलवाहिनी मंगरूळ व करंजविहिरे ते नवलाख उंब्रे येथील नियोजित बीपीटी पर्यंत व एकत्रित गुरूत्व जलवाहिनी नवलाख उंबे्र बीपीटी ते चिखली येथील नियोजित जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत नेण्यात येणार आहे. त्यासाठी जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वित करून त्वरित पाणीपुरवठा योजना चालू होणे आवश्यक आहे, असे पालिकेने या पत्रात म्हटले आहे. मात्र, आंद्रा व भामा-आसखेड येथील स्थानिक ग्रामस्थ; तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्‍न प्रलंबित आहेत. 

हे प्रश्‍न मार्गी लागण्यास विलंब होण्याची चिन्हे असल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून सुदुंबरेजवळ इंद्रायणीवरील कोल्हापूर पध्दतीचा बंधारा येथून किंवा बोडकेवाडी येथील प्राधिकरणाच्या ताब्यातील योजनेशेजारी पंपिंग स्टेशन उभारणे आवश्यक आहे. यासाठीच पालिकेने या जागेची मागणी या पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे देहूचे शाखा अभियंता धनंजय जगधने यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

स्थानिकांकडून विरोधाची शक्यता

शहराची भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी पवना धरणातून थेट बंदिस्त वाहिनीद्वारे पाणी नेण्याचा प्रयत्न होता. मात्र, मावळातील शेतकर्‍यांचा विरोध आणि पोलिसांकडून शेतकर्‍यांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे हे प्रकरण रखडले. त्यानंतर पालिकेने भामा-आसखेड आणि आंद्रा धरणांतून पाणी उचलण्याचा निर्णय घेतला. मात्र, भामा-आसखेड येथे स्थानिक व प्रकल्पग्रस्तांनी विरोध केला. त्यामुळे आता पालिकेकडून देहूचा पर्याय निवडला गेला आहे. मात्र, भविष्यात याला ग्रामस्थांकडून विरोध शक्य आहे. पालिकेत समावेशाला विरोध करणारे देहूकर या प्रकल्पाला विरोध करतील, अशी चिन्हे आहेत.