Fri, Feb 22, 2019 03:41होमपेज › Pune › आता अवघ्या दोन तासांत क्षयरोग निदान

आता अवघ्या दोन तासांत क्षयरोग निदान

Published On: Feb 14 2018 2:55AM | Last Updated: Feb 14 2018 1:08AMपिंपरी  : प्रतिनिधी

केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्याला क्षयरुग्णांसाठी दोन अद्ययावत फिरत्या रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. त्यापैकी एक रुग्णवाहिका नवी सांगवी येथील उरो रुग्णालयासाठी दिली आहे. या रुग्णवाहिका आदिवासी व दुर्गम भागात फिरून क्षयरुग्णांची तपासणी करणार असून, अवघ्या दोन तासांत त्याचा अहवाल देणार आहेत.   केंद्र शासनाच्या वतीने सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. देश क्षयरोगापासून मुक्‍त करण्याचे केंद्र शासनाचे स्वप्न आहे. त्याअंतर्गत दोन अद्ययावत फिरत्या रुग्णवाहिका महाराष्ट्र राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत.

यांपैकी एक नागपूर व दुसरी पुणे जिल्ह्यातील नवी सांगवी येथील उरो रुग्णालयाला देण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेमध्ये असणारे डॉक्टर शहरांसह खेड्यात फिरून रुग्णांचा शोध घेऊन उपचार करणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत क्षयरोग रुग्णांना खरोखरच क्षयरोग झाला आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे अवघ्या दोन तासांत रिपोर्टनुसार क्षयरोगाचे निदान होणार आहे. ही कार्यप्रणाली अद्ययावत असून, या फिरत्या रुग्णवाहिकेचा उपयोग ग्रामीण भागातील वस्त्या, आदिवासी वस्त्या; तसेच डॉगर वस्त्यांमध्ये राहणार्‍या रुग्णांसाठी सुरू करण्यात आला आहे. 

नवी सांगवी येथील उरो रुग्णालयात पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली व इतर जिल्ह्यांतील रुग्णही उपचाराठी येत आहेत. राज्यभरात क्षयरुग्णांची तपासणी करण्यासाठी दोन सेंटर सुरू करण्यात आली आहे. नागपूर व पुणे जिल्ह्यातील उरो रुग्णालय या ठिकाणी ही दोन सेंटर आहेत. उरो रुग्णालयात दिवसाकाठी 25 रुग्णांची तपासणी होत आहे. या ठिकाणी रोज 12 रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत.

रुग्णालयात अनेकांना उपचार घेण्यासाठी येणे शक्य होत नाही. त्यामुळे सध्या रुग्णालयाच्या वतीने या फिरत्या रुग्णवाहिकेद्वारे क्षयरुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. आदिवासी भागात व महाराष्ट्रातील अर्ध्या जिल्ह्यातील रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. सध्या या रुग्णवाहिकेचा ताबा उरो रुग्णालयातीलच एसटीडीसी (स्टेट ट्रेनिंग अ‍ॅण्ड डायग्नोस्टीक सेंटर)कडे देण्यात आला आहे. त्यामुळे क्षयरुग्णांना याचा फायदा  होणार आहे.