Mon, Apr 22, 2019 23:41होमपेज › Pune › निगडीपर्यंतच्या मेट्रोसाठी लाक्षणिक उपोषण करणार

निगडीपर्यंतच्या मेट्रोसाठी लाक्षणिक उपोषण करणार

Published On: Feb 04 2018 1:56AM | Last Updated: Feb 04 2018 12:30AMपिंपरी : प्रतिनिधी

पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रोचे काम करण्यास केंद्र सरकारने तत्त्वतः मंजुरी दिली असली, तरी देखील इतर सर्व स्तरांवरून या मागणीबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे.कात्रजपर्यंत मेट्रो जाऊ शकत नसल्यानेच पिंपरी-निगडी मेट्रोला जाणीवपूर्वक रोखण्यात येत आहे. निगडीपर्यंतच्या मेट्रोसाठी  फोरमने लाक्षणिक उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे.  फोरमच्या वतीने शनिवारी (दि.2) झालेल्या पत्रकार परिषदेत फोरमचे तुषार शिंदे यांनी हा इशारा दिला आहे. या वेळी फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे म्हणाले की, मेट्रोला देखील पुण्याचे नाव देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील मेट्रोमार्ग पिंपरी-चिंचवड शहरापेक्षा पुणे शहरातून जास्त अंतर जात आहे.

त्यामुळे त्याचा पिंपरी-चिंचवड शहराला काय फायदा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.  पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत पोचावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळा फोरमने भेट घेतली; मात्र त्यांनी याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. पालकमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रो निगडीपर्यंत जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले, त्यामुळे नागरिकांची मोठी निराशा झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने निधी देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असूनही, या कामाच्या मंजुरीसाठी अडथळे निर्माण केले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मिस्ड कॉल’ मोहिमेत  आजपर्यंत 6 हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी 08030636448 या क्रमांकावर ‘मिस्ड कॉल’ देऊन मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. या मागणीसाठी फोरमतर्फे उपोषण आंदोलन केले जाणार आहे. 

850 कोटींचा वाढीव खर्च 

पुणे मेट्रोचा पहिला टप्पा 11.5 हजार कोटींचा आहे. जर पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत गेली, तर या कामासाठी 850 कोटी रुपये एवढा खर्च येईल. ही रक्कम पहिल्या टप्प्याच्या केवळ 8 टक्के एवढी आहे. वाढीव निधी उभा करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका आणि ‘सीएसआर’अंतर्गत प्रयत्न करण्यात येऊ शकेल. संपूर्ण 850 कोटी रुपयांचा निधी 5 वर्षांत जमा करायचा असल्याने वार्षिक 170 कोटी रुपये उभे करावे लागणार आहेत. दुसर्‍या टप्प्यातील मेट्रोचा खर्च सुमारे 20 हजार कोटी रुपये इतका आहे. हा दुसरा टप्पा सन 2022 नंतर येणार आहे. त्यानंतर येणार्‍या अडचणींमध्ये देखील तेवढीच वाढ होणार आहे. सध्या पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो नेण्यासाठी काही अडचणी नसल्याचे सांगण्यात येत आहे, असे तुषार शिंदे यांनी सांगितले.