Wed, Jul 08, 2020 01:26होमपेज › Pune › मेमरी कार्ड आणि ८०० रुपयांसाठी खून

मेमरी कार्ड आणि ८०० रुपयांसाठी खून

Published On: Aug 19 2018 1:29AM | Last Updated: Aug 19 2018 12:39AMपिंपरी : प्रतिनिधी 

एक महिन्यापूर्वी रहाटणी येथे बस चालकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. पोलीस तपासात मित्रानेच मोबाईलचे मेमरी कार्ड आणि 800 रुपयांसाठी  हा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

पवन उर्फ अनिल रमेश सुतार (39,रा. चिंबळी, खेड) असे खून झालेल्या चालकाचे नाव असून, त्याचा मित्र अनिल श्रावण मोरे (39, रा.राहटणी) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार 16 जुलै रोजी रहाटणी येथील एका खासगी बसमध्ये चालक सुतारचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी 170 जणांचे कॉल रेकॉर्ड तपासले. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. सुतार यांना दारूचे व्यसन असल्याने त्याच्यासोबत दारू पिणार्‍या सर्वांची माहिती गेळा केली असता, सुतार आणि मोरे एकत्रीत दारू पीत असल्याची समोर आले. मोरेचा मोबाईल खुनाच्या घटनेनंतर बंद असल्याचे निदर्शनास आले. मोरेचा शोध घेत असताना तपास पथकाला त्याचा ठावठिकाणा मिळाला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली असता त्याने सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुढील चौकशीत त्याने खून केल्याची कबुली दिली. 

सुताराने गाणे ऐकण्यासाठी मोरेच्या मोबाईलचे मेमरी कार्ड काढून घेतले होते. तसेच एका मजुरी कामाचे 800 रुपये देखील सुतारकडे होते. मोरेने कित्येकदा मागणी करूनही सुतार पैसे देण्यास तयार नव्हता. या कारणाने त्यांच्यात अनेकदा वाद होत असे. 16 जुलै रोजी सकाळी सुतार आणि मोरे यांनी एकत्रित दारू घेतली. दारू पीत असताना पुन्हा त्याच कारणाने त्यांच्यात भांडणे होऊन हाणामारी झाली. त्यानंतर मोरे रात्री आणखी दारू पिऊन आला व बसमध्ये झोपलेल्या सुतारवर चाकूने 34 वार करून त्याचा खुन केला. 

ही  कामगिरी वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे हरीश माने कर्मचारी, धनराज किरनाळे, शाम बाबा, विभीषण कन्हेरकर, अशोक दुधावने, भैरोबा यादव, बापू धुमाळ, रमेश गायकवाड, महंमदगौस नदाफ यांच्या पथकाने केली.