Tue, Mar 19, 2019 15:31होमपेज › Pune › पिंपरीच्या महापौर व उपमहापौरांची नावनिश्‍चिती होणार मंगळवारी 

पिंपरीच्या महापौर व उपमहापौरांची नावनिश्‍चिती होणार मंगळवारी 

Published On: Jul 27 2018 1:26AM | Last Updated: Jul 27 2018 12:59AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे व उपमहापौर शैलजा मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मंगळवारी (दि. 24) दिला. या रिक्त झालेल्या पदासाठी मंगळवार (दि. 31) अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्या दिवशी भाजपच्या दुसर्‍या महापौर व उपमहापौराचे नाव निश्‍चित होणार आहे. तसेच, निवडणुकीची विशेष सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. 4 ऑगस्ट) सकाळी अकराला आयोजित केली आहे, अशी माहिती नगरसचिव उल्हास जगताप यांनी गुरुवारी (दि.26) दिली. 

महापौर व उपमहापौर यांचे पद रिक्त झाले असून, हे पद भरण्यासाठी निवडणूक घेण्यासाठी पालिकेने पुणे विभागीय आयुक्तांना बुधवारी (दि. 25) पत्र पाठविले होते. मुंबई प्रांतिक महापालिका नियम, 2005 कलम 3 (1) मध्ये महापालिकेच्या महापौर व उपमहापौर या पदाच्या निवडणुका घेण्यासाठी विशेष बैठक घेण्याची तरतूद आहे. या नियमामध्ये शासनाने 12 ऑक्टोबर 2006 संमत करण्यात आलेले असून, त्यानुसार विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त अथवा त्यांचा प्रतिनिधी असेल, अशी तरतूद करण्यात 
आलेली आहे. 

या विशेष सभेसाठी पीएमपीएलच्या अध्यक्षा नयना गुंडे यांना पिठासन अधिकारी म्हणून  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी नियुक्त केले आहे. पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात 4 ऑगस्टला सकाळी 11 ला होणार्‍या सभेत भाजपच्या महापौर व उपमहापौराची निवड होईल. या पदासाठी मंगळवारी (दि. 31) दुपारी 3 ते 5 या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जाच्या संख्येवरून निवड बिनविरोध होणार की निवडणुकीने हे स्पष्ट होणार आहे. सत्ताधारी भाजपचा प्रत्येक पदासाठी एकच अर्ज आल्यास त्या दिवशीच महापौर व उपमहापौराचे नाव निश्‍चित होईल. चार ऑगस्टला होणार्‍या विशेष सभेत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.