Sun, Aug 25, 2019 00:09होमपेज › Pune › आ. लांडगे यांची आ. लक्ष्मण जगताप यांच्यावर मात

आ. लांडगे यांची आ. लक्ष्मण जगताप यांच्यावर मात

Published On: Aug 01 2018 1:33AM | Last Updated: Jul 31 2018 11:42PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी- चिंचवडच्या महापौरपदी नितीन काळजे यांच्यानंतर पुन्हा एकदा राहुल जाधव यांच्या रूपाने आपल्या समर्थकाची वर्णी लावून आ. महेश लांडगे यांनी भाजप शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांना मात दिली आहे. याबरोबरच समाविष्ट गावे व माळी समाजाला आपलेसे करत विधानसभेची तयारीही केली आहे. 

सन 2017 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत सत्तांतर झाले. भाजपची सत्ता आली . महापौरपदासाठी आ. जगताप समर्थक नामदेव ढाके यांचे नाव पुढे होते.  मात्र, प्रसंगी बंडाचा इशारा देऊन आ. लांडगे यांनी आपले समर्थक काळजे यांची महापौरपदी वर्णी लावून घेतली. सर्वांना संधी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी महापौर, उपमहापौर यांना राजीनामे देण्याचे आदेश दिले. त्यांनी राजीनामे दिल्याने येत्या दि. 4 ऑगस्ट रोजी पालिका विशेष सभेत ही निवड केली जाणार आहे. आज मंगळवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याने लॉबिंग सुरू होते. आ. लांडगे गटाचे राहुल जाधव, संतोष लोंढे तर आ. जगताप गटाचे शत्रूघ्न काटे, नामदेव ढाके, शशिकांत कदम, शीतल शिंदे यांची नावे चर्चेत होती. आ. लांडगे यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत खेळया केल्या.

जाधव यांच्यासाठी माळी समाजाला पुढे केले.अखिल माळी समाजाने भाजपच्या यशातील आपले योगदान सांगत पत्रकार परिषद घेतली. भाजपची सत्ता आल्यावर ओबीसीसाठी आरक्षित जागेवर माळी समाजाला डावलून कुणबी मधून काळजे यांना संधी दिली.  स्थायी अध्यक्षपद निवडीतही समाजाला डावलले आता तरी महापौरपदी माळी  संधी द्या, अन्यथा  त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला. एकीकडे जातीचे कार्ड चालविले जात असताना दुसरीकडे  स्थायी अध्यक्षपदासाठी ममता गायकवाड यांचे नाव अचानक पुढे आणून त्यांची वर्णी लावलेल्या आ. जगताप यांच्या खेळयांची लांडगे  समर्थकांना काहीशी धास्ती होती. जगताप हे शत्रूघ्न काटे यांच्यासाठी प्रयत्न करत होते. तर नामदेव ढाके हे निष्ठावंत असल्याचा मुद्दा घेऊन महापौरपदी आपली वर्णी लागावी म्हणून प्रयत्नशील होते. पण या सर्वांना मात देत आ. लांडगे यांनी जाधव यांची महापौरपदी वर्णी लावली.  आ. जगताप समर्थक सचिन चिंचवडे यांची उपमहापौरपदी निवड निश्चित झाली आहे.

भोसरी विधानसभेला फायदा

भोसरी मतदारसंघात भोसरी, जाधववाडी, डुडुळगाव, मोशी, चर्‍होली भागात माळी समाजाचे मोठे मतदान आहे. माळी समाजाच्या राहुल जाधव यांना महापौरपदी संधी दिल्याने त्याचा राजकीय लाभ आ. लांडगे यांना होणार आहे.

निष्ठावंतांना डावलले 

महापौरपदी निवड निश्चित असलेले राहुल जाधव हे पालिका निवडणुकीपूर्वी मनसेतून भाजपात तर उपमहापौरपदी निवड निश्चित असलेले सचिन चिंचवडे राष्ट्रवादीतून भाजपात आले आहेत. स्थायीच्या यापूर्वीच्या अध्यक्षा सीमा सावळे या सेनेच्या माजी नगरसेविका होत्या. त्यामुळे भाजपात निष्ठावंतांना डावलले जात असल्याची चर्चा आहे