Tue, Jan 22, 2019 07:31होमपेज › Pune › प्राधिकरणात कमी दाबाने पाणीपुरवठा

प्राधिकरणात कमी दाबाने पाणीपुरवठा

Published On: Jan 06 2018 1:40AM | Last Updated: Jan 06 2018 1:35AM

बुकमार्क करा
पिंपरी ः प्रतिनिधी

प्राधिकरण प्रभाग क्रमांक 15 मध्ये गेल्या काही दिवसांपासून अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, यामुळे संतापलेल्या उपमहापौर व स्थानिक नगरसेविका शैलजा मोरे यांनी आज पालिका अधिकार्‍यांना फैलावर घेतले. आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. प्राधिकरण भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन उपमहापौर शैलजा मोरे यांनी आज पाणीपुरवठा अधिकार्‍यांची बैठक घेतली. या वेळी सहशहर अभियंता रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत आदी उपस्थित होते

प्राधिकरण भागातील नागरिकांना दोनच तास तेही कमी दाबाने पाणी मिळते. गरज 25 एमएलडीची असताना फक्त 15 एमएलडी पाणी दिले जाते, असे शैलजा मोरे म्हणाल्या. येत्या आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा; तसेच काळी फीत लावून पालिकेत येण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यावर सेक्टर 23 मध्ये पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. निविदा काढली आहे. टाकीचे काम पूर्ण झाल्यावर गंगानगर व से. नं 28 मधील पाणीप्रश्‍न मार्गी लागेल, असे अधिकार्‍यांनी बैठकीत सांगितले  

सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, गेल्या चार-पाच दिवसापासून टाक्या भरल्याशिवाय कर्मचारी पाणी सोडत नव्हते. एखादे वेळी ठीक आहे; पण नेहमी असे होता कामा नये, अशी समज संबंधितांना दिली आहे. टाकी भरायला उशीर होत असेल, तर नगरसेवकांना एसएमएस करावेत, अशा सूचनाही त्यांना दिल्या आहेत. प्राधिकरणास 23 एमएलडी पाण्याची गरज असून, तेवढे पाणी पालिका देते. हा ‘क्वाँटिटी’चा प्रश्‍न नसून, ‘प्रेशर’चा आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे दुधेकर यांनी सांगितले.