Wed, Jun 26, 2019 18:18होमपेज › Pune › स्वतंत्र पोलिस आयुक्तालयास मुहूर्त कधी?

स्वतंत्र पोलिस आयुक्तालयास मुहूर्त कधी?

Published On: Dec 11 2017 1:33AM | Last Updated: Dec 11 2017 12:14AM

बुकमार्क करा

अमोल येलमार

पिंपरी : पोलिस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नेतेमंडळी सगळेच पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त करतात. शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय सुरू झाल्यास गुन्हेगारी नक्कीच कमी होईल, हे खरे आहे; मात्र शहरात पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश येत असल्याने खुलेआम गुन्हेगारी सुरू आहे. हे पाहता स्वतंत्र आयुक्तालयास मुहूर्त कधी लागणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. वित्त खात्याने यास हिरवा कंदील दाखवला असून, तपास अहवाल अर्थमंत्र्यांकडे पाठवला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सोमवारपासून सुरू होत असलेल्या हिवाळी आधिवेशनात  याची घोषणा होणार का याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. 

शहराला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय व्हावे, अशी मागणी गेल्या 15 वर्षांपासून होत आहे. याबाबत अनेकदा पत्रव्यवहारही करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. त्यामुळे मोठ्या हालचाली झालेल्या आहेत. यासाठी आमदार गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, शरद सोनावणे, राहुल कुल यांनी लक्षवेधी सूचना केली होती. त्यांच्या सूचनेवर गृहराज्यमंत्र्यांनी उत्तर दिले होते; तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात असताना त्यांनी आयुक्तालय लवकरच सुरू होईल, असे आश्‍वासन दिले होते. मागील अधिवेशनात हा प्रस्ताव वित्त खात्याकडे गेल्याचे सांगण्यात आले होते. वित्त खात्याने यावर अहवाल अर्थमंत्रालयाकडे पाठवला असल्याचे बोलले जात आहे.

पिंपरी-चिंचवड आणि स्वतंत्र आयुक्तालयाच्या हद्दीत प्रस्तावित असलेल्या ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीकडे पाहता सगळीकडे गुन्हेगारीने थैमान मांडले आहे. नुकतेच आकुर्डी परिसरातील दोन टोळ्यांमध्ये युद्ध पेटल्याचे दिसत आहे. यातून एका टोळीने गोळीबार केला. याचा बदला म्हणून दुसर्‍या टोळीच्या म्होरक्याचा खून करण्यात आला. विशेष म्हणजे यासाठी दोन्ही टोळ्यांनी बेकायदेशीर पिस्तुलांची मोठी खरेदी केल्याचेही समोर आले. ग्रामीण पोलिसांच्या देहूरोड, चाकण, तळेगाव, पौड पोलिस ठाण्यांच्या काही भागात गंभीर गुन्हे घडत आहेत. यांसारखे प्रकार समोर घडत आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ, वरिष्ठ अधिकारी नाहीत तरीदेखील आयुक्तालयाचा निर्णय लागला जात नाही. पुणे शहराला लागून आणि मुंबई शहरापासून जवळ असलेल्या या पिंपरी-चिंचवड शहरात आंतरराष्ट्रीय टोळ्यांचे सदस्य सक्रिय आहेत. या परिसरातील जमिनीला सोन्याचे भाव आल्याने जागा बळकावणे हा एक मोठा व्यवसाय झाला असून, यामध्ये दिग्गज गुन्हेगारांना हाताशी धरून हा व्यवसाय केला जात आहे. 

शहर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांच्या आणि राजकीय पदाधिकार्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करतात. गुन्हेगारी रोखण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष; तसेच अप्पर पोलिस आयुक्त शहरात बसतील असे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात काहीच यंत्रणा नसल्याचे दिसत आहे. शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही. वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जातात; मात्र त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पुन्हा गुन्हेगार शहरात वावरतात आणि गुन्हे करतात. पोलिसांच्या खबर्‍यांचे जाळे संपुष्टात आले आहे. त्यामुळे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे उघडकीस आलेले नाहीत. शहरातील सध्याची परिस्थिती पाहता शहरात मोठ्या संख्येने पोलिसांची गरज आहे.