Fri, Apr 19, 2019 11:59होमपेज › Pune ›  स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालयासाठी अधिकार्‍यांच्या हालचाली

 स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालयासाठी अधिकार्‍यांच्या हालचाली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी :  प्रतिनिधी

वाढते गुन्हेगारी, नव्याने उदयास येणारे भाई, गंभीर स्वरूपाचे गुन्हे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी असणारे अपुरे पोलिस बल यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची चर्चा होती. यावर अनेकदा चर्चा झाल्या, प्रस्ताव तयार झाले, आजी-माजी आमदारांंनी पाठपुरावा केला. त्यानंतर अर्थसंकल्पी अधिवेशनात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलिस आयुक्तालयासाठी प्रयत्न सुरू असल्याचे घोषित केले. यानंतर अनेक अधिकार्‍यांनी नव्याने होणार्‍या या पोलिस आयुक्तालयात वर्दी लागावी यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून हालचाली सुरू केल्या आहेत, तर पोलिस आयुक्तपद हे अप्पर पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी असण्याची शक्यता आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र महानगरपालिका, न्यायालय, आरटीओ, राज्य परिवहन महामंडळ यासोबत अनेक शासकीय कार्यालये आहेत. औद्योगिक, कामगार, आयटी हब, शैक्षणिक संस्था आणि मोठमोठे गृहप्रकल्प असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव करण्यास अनेक जण पसंती देतात. त्यामुळे दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत आहे. शहराची लोकसंख्या पुणे शहराच्या तुलनेत निम्मी आहे. 25 लाखांच्या घरात लोकसंख्या असलेल्या शहरासाठी अवघे हजार-पंधराशे पोलिस कार्यरत आहेत. यामुळे शहराची गुन्हेगारी वाढलेली आहे. हा परिसर सध्या पुणे पोलिसांच्या हद्दीत आहे. पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षाला सुमारे चार हजार गंभीर गुन्ह्यांची नोंद होते. शहरात अनेकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो.

नवी मुंबईच्या धर्तीवर शहराचे नवीन आयुक्तालय होणार आहे. यामध्ये पंधरा पोलिस ठाण्यांचा समावेश होणार आहे. पुणे शहर पोलिसांच्या झोन तीनमधील पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी, सांगवी, हिंजवडी, वाकड यांसह झोन चारमधील दिघी पोलिस ठाणे याचा पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात समावेश केले जाणार आहे; तसेच नव्याने सुरू होणार्‍या प्रस्तावित चिखली पोलिस ठाण्याचा समावेश होणार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारित असलेले देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, आळंदी व चाकण ही पोलिस ठाणे ही या नव्याने होणार्‍या आयुक्तालयाला जोडण्यात येणार आहेत.

दोन परिमंडळात (उपायुक्त) पंधरा पोलिस ठाण्यांची विभागणी केली जाईल; तसेच चार सहायक आयुक्तालय असतील. याव्यतिरिक्त एका उपायुक्तांची (डीसीपी) नेमणूक केली जाईल. दोन झोन डीसीपींव्यतिरिक्त अन्य डीसीपींकडे गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखा, मुख्यालय, नियंत्रण कक्ष, वायरलेस हे विभाग सोपविले जाऊ शकतात. त्याचबरोबर गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखा, मुख्यालय, वायरलेस या विभागासाठी प्रत्येकी स्वतंत्र सहायक आयुक्ताची नेमणूक केली जाणार आहे; तसेच गुन्हे शाखेची दोन ते तीन युनिट होतील. पंधरा पोलिस ठाण्यांचे 30 निरीक्षकांसह गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखा, मुख्यालय, नियंत्रण कक्षासाठी निरीक्षकांची नेमणूक केली जाईल.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून यास ‘ग्रिन सिग्नल’ आल्याने नवीन आयुक्तालयात येण्यासाठी अनेक पोलिस अधिकार्‍यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. पोलिस कर्मचारी ते पोलिस आयुक्त पदाच्या सर्व पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहिले आहे. पुणे पोलिस आयुक्तालय; तसेच पुणे ग्रामीण पोलिस दलात काम करून गेलेले अधिकारी पुन्हा नव्याने होणार्‍या आयुक्तालयात येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी आपआपल्या मार्गाने त्यांच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. 
 


  •