Sat, Apr 20, 2019 08:46होमपेज › Pune › कुत्री उठली जिवावर !

कुत्री उठली जिवावर !

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : वर्षा कांबळे

शहरात मोकाट जनावरांबरोबरच भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या शहरामध्ये अनेक वेळा भटक्या कुत्र्याने चावा घेण्याबरोबरच नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. अलीकडे भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांना आपले लक्ष्य केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत असून, त्यांच्या संख्येचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एप्रिल 2017  ते फेब्रुवारी 2018  या वर्षात 2678 व्यक्तींना कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडलेल्या आहे, तर सध्या चालू वर्षात 518 जणांना कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनांची नोंद आहे, तर खासगी रुग्णालयांत आणखी रुग्ण असण्याची शक्यता आहे. 

शहरात कचर्‍याच्या समस्येमुळे आजारांनी थैमान घातले आहे. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय भेडसावतो आहे तो म्हणजे भटक्या कुत्र्यांचा. भटक्या कुत्र्यांची संख्या शहरात वाढली आहे. रस्त्याने जाताना विशेषत: रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळी कुत्र्यांच्या झुंडीने अंगावर धावून येणार्‍या घटना शहरात घडत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक महापालिकेच्या रुग्णालयामध्ये व दवाखान्यामध्ये एक किंवा दोन तरी कुत्रा चावलेले रुग्ण येतात, तर खासगी रुग्णालयांतही रुग्णांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. 

कुत्र्यांना महापालिकेचे कर्मचारी पकडून नेतात. त्यांच्यावर नसबंदी करून पुन्हा परिसरात सोडतात, तरीदेखील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी झालेली दिसून येत नाही. शहरामध्ये या भटक्या कुत्र्यांना खायला प्यायला देऊन भूतदया दाखविणारे नागरिकही आहेत. यामुळे सोसायट्या आणि वस्त्यामध्ये भांडणे देखील होतात. अनेक ठिकाणी सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये भटकी कुत्री फिरत असतात. रात्री-अपरात्री ही कुत्री ओरडत असतात. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, अभ्यास करणारे विद्यार्थी यांना त्रास होतो.

भटक्या कुत्र्यांना भूतदया दाखविली नाही, तरी  त्यांना रस्त्यावरील कचराकुंड्यांमध्ये फेकण्यात येणार्‍या अन्नाचे प्रमाण कमी होणे गरजेचे आहे. कचर्‍यांच्या ढिगामध्ये भटक्या कुत्र्यांना अन्नपदार्थ सहजपणे मिळतात. त्यामुळे त्या भागात कुत्र्यांची संख्या वाढते. प्राणिप्रेमी संस्थांनी भटक्या कुत्र्यांना न मारता त्यांची नसबंदी करण्याचा तोडगा काढला आहे. यामध्ये कुत्र्यांच्या लहान पिलांना हात लावता येत नाही. त्यामुळे दर वर्षी भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळेच भटक्या कुत्र्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 


  •