Thu, Sep 20, 2018 01:57होमपेज › Pune › शहरातील पदपथ भाड्याने दिलेत का

शहरातील पदपथ भाड्याने दिलेत का

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

शहरातील विविध भागांतील पदपथ हळूहळू गिळंकृत होत असून, जवळपास सर्वच पदपथ वस्तू विक्रीचे अड्डे बनले असल्याचे चित्र आहे. शहरातील विविध भागांत पदपथांवर विक्रेत्यांनी कब्जा केला आहे. त्यामुळे पादचार्‍यांना पदपथ असूनही जीव मुठीत घेऊन वर्दळीच्या रस्त्यांमधून वाट काढत जावे लागत आहे. यामुळे पादचार्‍यांना रोजचा त्रास सहन करावा लागत असून, महापालिकेने पदपथ विक्रेत्यांना भाड्याने दिले आहेत का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. 

काही ठिकाणी पदपथांवर पूर्वी विक्रेत्यांचे फक्त टेबल होते. आता मात्र या विक्रेत्यांचा व्यवसाय चांगलाच तेजीत आला असून, या पदपथांवर कपाट, टेबल यासह फर्निचर व फळ विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. काही ठिकाणी फळ विक्रेते, तर काही भागांत विविध वस्तू विकणारे परप्रांतीय नजरेस पडत असून, त्यांच्याकडे महापालिकेकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. हे पदपथांवरील विक्रेते जाणूनबुजून वर्दळीच्या ठिकाणी बस्तान मांडत आहेत. उन्हाळ्यामुळे आंबा, कलिंगड, शहाळे यांना विशेष मागणी असते, हे हेरून हे विक्रेते मुख्य रस्त्यांलगतच्या पदपथांवर आता पाय पसरू लागले आहेत. महापालिकेकडून त्यांना हटवले जात नसल्याने नागरिकांत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

पदपथांवर दुपारी फळे; तसेच माठ विक्रेते यांचे बस्तान असते, तर सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत मसाला दूध, चायनीज फूड व पावभाजीच्या हातगाड्यांनी पदपथ व आजूबाजूचा परिसर घेरला जातो. चिंचवड, पिंपरी गाव, बिजलीनगर; तसेच निगडी व शहरातील विविध भागांतील मुख्य रस्त्यांलगतच्या पदपथांवर हेच दृश्य नजरेस पडत आहे.  स्थानिक नगरसेवक व महापालिकेने या विक्रेत्यांवर कारवाई करावी व पदपथ पादचार्‍यांसाठी मोकळे करून द्यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 
 


  •