Sat, Aug 24, 2019 21:31होमपेज › Pune › गुन्हेगारी प्रवृत्तीच्या चालकांमुळे वाढता धोका

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या चालकांमुळे वाढता धोका

Published On: Feb 06 2018 1:48AM | Last Updated: Feb 06 2018 1:25AMपिंपरी ;अमोल येलमार

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी आणि व्यवस्थित नसल्याने दोन्ही ठिकाणी खासगी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे अशा वाहनांवर असणार्‍या चालकांची संख्या मोठी आहे. अनेक चालक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात; मात्र त्यांना चांगल्या प्रवृत्तीचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळते आणि तेथून त्यांची पुढील गुन्हेगारीकडे वाटचाल होते. एकीकडच्या पोलिसांची चिरीमिरी दुसरीकडील पोलिसांना डोकेदुखी ठरते आणि अशा चालकांचा धोका सगळ्या समाजापुढे निर्माण होतो.

सत्तर लाखांपुढे लोकसंख्या असलेले आणि दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होत असलेली पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरे आहेत. या ठिकाणी देशाच्या कानाकोपर्‍यांतून; तसेच परदेशातून नोकरी, शिक्षण, उद्योगासाठी आलेले नागरिक, तरुण-तरुणी स्थायिक झालेले आहेत. एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या या शहरात सर्वच ठिकाणी वेळेत पोचण्यासाठी पुरेशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. यामुळे अनेक जण खासगी वाहनाकडे वळतात. आर्थिक परिस्थिती ठीक असलेले स्वतःचे वाहन खरेदी करतात; मात्र काही जण रिक्षा, ओला, उबेर या खासगी वाहन व्यवस्थेचा पर्याय म्हणून वापर करतात.

शहरामध्ये नोंदणीकृत वाहने लाखोंच्या घरात आहेत. यामध्ये व्यावसायिक नोंदी केलेली वाहने वेगळी आहेत, तर बाहेरच्या जिल्ह्यांतून व्यवसायासाठी आलेल्या वाहनांची संख्याही तेवढीच मोठी आहे. या वाहनांवर असणारे चालक वेगवेगळ्या जिल्ह्यांतील आहेत.  नियमानुसार प्रत्येक वाहन चालकाचे पोलिस ‘व्हेरिफिकेशन’ असणे आवश्यक आहे, याशिवाय कंपन्यांमध्ये कामाला जाणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक जण आपल्या मूळ गावच्या पोलिस ठाण्यातून आपले चारित्र्य प्रमाणपत्र आणतात. चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र असे चालक संबंधितांना चिरीमिरी देऊन ते मिळवतात आणि आपल्या नोकरीच्या ठिकाणी सादर करतात. 

शहरामध्ये वाहन चालकांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडलेले अनेक प्रकार आहेत. यातील म्हणजे पुणे आणि हिंजवडी आयटी हबला हादरवून सोडणारा सामूहिक बलात्कार. नागपूर येथून नोकरीसाठी आलेली तरुणी वाहनाची प्रतीक्षा करत थांबलेली होती. त्या वेळी आयटी कंपनीची एक ‘कॅब’ त्या ठिकाणी आली. त्यातील चालक नराधमाने तिला ‘लिफ्ट’ दिली. त्यानंतर तिला 2 किलोमीटर अंतरासाठी संपूर्ण पुणे शहरात फिरवले. दरम्यानच्या काळात त्याने मित्रांसोबत कट आखला.

त्याच्या साथीदारांना बोलावून घेतले. हिंजवडी परिसरातील डोंगराळ भागात नेऊन तेथे तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. पोलिसांनी गुन्हेगारांना पकडले, त्या वेळी यातील मुख्य सूत्रधार हा गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचा असून, त्याच्यावर तडीपारीची कारवाई रद्द केल्याची  माहिती समोर आली होती.
वाकड पोलिसांनी अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेले 74 लाख 50 हजार चोरीप्रकरणी चौघांना अटक केली. हे चौघेही वेगवेगळ्या वाहनांवर चालक म्हणून काम करत असून, ते बीड जिल्ह्यातील असून, दिघी परिसरात एकत्र राहतात.  यातील तिघांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे, तर ज्याने लाखो रुपयांची रोकड असणारी पेटी पळवून नेली तो दारुडा आहे.

या कटातील मुख्य सूत्रधारावर दरोडा, मारहाणी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारचे गुन्हे दाखल असताना देखील हे शहरात वेगवेगळ्या वाहनांवर चालक म्हणून काम करत होते. याचा शोध गंभीर गुन्हा घडल्यानंतर समोर आला. अशा प्रकारे शहरात अनेक चालक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.