Wed, Sep 19, 2018 09:31होमपेज › Pune › दापोडी-निगडी ‘बीआरटी’ कधी धावणार

दापोडी-निगडी ‘बीआरटी’ कधी धावणार

Published On: Feb 12 2018 2:04AM | Last Updated: Feb 12 2018 2:04AMपिंपरी  : प्रतिनिधी

पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील दापोडी ते निगडी या महत्वाकांक्षी बीआरटी मार्गिकेवर (लेन) बस थांबा, रस्त्यांवर पांढरे व लाल पट्टे, वाहतूक नियंत्रक दिवे, दिशादर्शक फलक, गतीरोधक, डांबरीकरण, बॅरीकेट्स आदी सातत्याने होणारी कामे पाहून नागरिक अक्षरशा वैतागले आहेत. पुढील महिन्यात, पुढील महिन्यात, असे सांगत आयुक्त व प्रशासनाने 2017 घालविले. नवीन वर्षांचा सव्वा महिना उलटला. तरी बससेवा सुरूच झालेली नाही. कधी एकदाची या मार्गावरून बस धावते, याचे वेध त्रस्त वाहनचालक व पादचार्‍यांना लागले आहेत.

या 12.50 किलोमीटर अंतरावर दापोडी ते निगडी मार्गावर दुहेरी बीआरटी लेन तयार आहे. त्यास 7 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटत आला आहे. हा प्रशस्त ग्रेडसेपरेटर मार्गावर बीआरटीचे दोन लेन, मेट्रो कामामुळे बंद असलेल्या एक्सप्रेस मार्गावरील दोन लेनमुळे वाहतुक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे वैतागलेल्या वाहनचालक आणि पादचार्‍यांकडून कधी एकदाची बीआरटी सुरू होते, अशी विचारणा सतत केली जात आहे. 

मात्र, बीआरटीसंदर्भातील कामे वारंवार केली जात आहे. बस थांब्याचे दरवाजे, पत्रे चोरीला जात असल्याने त्याची दुरूस्तीकाम अधून-मधून सुरूच आहे. अरूंद सर्व्हिस रस्त्यावरून जाताना बीआरटीच्या लोखंडी बॅरीकेटसला वाहने धडकण्याचे प्रकार नित्याचे आहेत. ब्लिकींग दिवे व फलकाअभावी तसेच, काळवलेले बॅरीकेटस दिसत नसल्याने वाहनचालक बॅरीकेटसला धडकत आहेत. तुटलेले बॅरीकेटस दुरूस्तीचे काम वारंवार केले जात आहे. 

आयआयटीच्या दिवस व रात्रीच्या वेळेतील सूचना अहवालानुसार सुरक्षा उपाययोजना करून उच्च न्यायालयाच्या परवानगी बीआरटी तात्काळ सुरू केली जाणार असल्याचे तत्कालिन आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यापाठोपाठ आयुक्त श्रावण हर्डीकर व पालिका बीआरटीचे अधिकारी सांगत आहेत. पुढच्या महिन्यात सांगत आयुक्त हर्डीकर यांचा वर्षभराचा कार्यकाळ संपत आला आहे. तरी, बीआरटी अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुरू आहे. 

नव्या वर्षांतील फेबु्रवारी महिना उजाडला तरी, अद्याप महापालिका सुरक्षा उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. पालिकेचा आजपर्यंतचा संथगती कारभार लक्षात घेता, न्यायालयाकडून ‘हिरवा कंदील’ मिळण्यास बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे. परिणामी, बस सेवा लवकर सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत.