Wed, Jul 17, 2019 15:59होमपेज › Pune › पिंपरीचा ‘डीपी प्लॅन’ करणार बृहन्मुंबई पालिका

पिंपरीचा ‘डीपी प्लॅन’ करणार बृहन्मुंबई पालिका

Published On: Dec 07 2017 1:23AM | Last Updated: Dec 07 2017 12:21AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहराचा प्रारूप विकास योजना (ड्राफ्ट डेव्हल्पमेंट प्लॅन) तयार करून राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. या संदर्भातील सर्व कामकाज बृहन्मुंबई महापालिकेकडून करून घेण्यात येणार आहे. 

महापालिकेच्या जुन्या हद्दीची विकास योजना महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने 18 सप्टेंबर 1995 ला मंजूर केली. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची विकास योजना 28 नोव्हेंबर 1995 ला मंजूर झाली. प्राधिकरणाचे क्षेत्र महापालिका नियोजन नियंत्रणाखाली वर्ग करण्यात आला आहे. 

महापालिका व प्राधिकरणाच्या एकूण 86 चौरस किलोमीटर नियोजन क्षेत्रासाठी विकास योजना तयार करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) सुमारे 12.52 चौरस किलोमीटर क्षेत्र समाविष्ट आहे. महापालिकेच्या जुन्या हद्दीची विकास योजना नव्याने सुधारित करण्यात येत आहे. या कामासाठी महापालिका व प्राधिकरण एकत्रित 50 टक्के याप्रमाणे खर्च करणार आहे. महापालिकेने त्यास 21 नोव्हेंबर 2013 ला मान्यता दिली आहे. 

महापालिकेने जुन्या हद्दीच्या विकास योजना क्षेत्रासाठी सर्वेक्षण करून नकाशा तयार करण्याचे काम खासगी संस्थेमार्फत करून घेण्याबाबत निविदा प्रसिद्ध करण्यात आली. पुण्यातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्मेंटची एकमेव निविदा महापालिकेस प्राप्त झाली. वाढीव मुदतीमध्येही अन्य कोणत्याही संस्थेने प्रतिसाद न दिल्याने निविदा रद्द करण्यात आली. त्यानंतरही केवळ दोनच संस्थांनी निविदा दाखल केल्या. 

बृहन्मुंबई महापालिकेने नुकताच विकास आराखडा सुधारित केला आहे. विकास योजना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्याने तयार करण्याचा सदर महापालिकेच्या कामाचा अनुभवाचा लाभ होऊ शकतो, असे राज्य शासनाने पिंपरी महापालिकेस सुचवले होते. त्यानुसार दोन्ही बाजूच्या अधिकार्‍यांनी सविस्तर चर्चा केली आहे. कार्यपद्धती, अंदाजित खर्च व कालमर्यादा प्रस्ताव बृहन्मुंबई महापालिकेने 31 ऑक्टोबर 2017 ला पाठविला आहे. 

त्यानुसार विकास योजना सुधारित करण्याचे काम बृहन्मुंबई महापालिकेकडून करून घेण्याचा धोरणात्मक निर्णय आहे. सदर विषयाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आयत्या वेळी दाखल झाला आहे.