Tue, Mar 26, 2019 19:53होमपेज › Pune › राष्ट्रवादीच्या नगरसेविकेसह 20 जणांवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादीच्या नगरसेविकेसह 20 जणांवर गुन्हा दाखल

Published On: Jan 02 2018 1:51AM | Last Updated: Jan 02 2018 12:58AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर, त्रिवेणीनगर आणि म्हेत्रे वस्ती या परिसरातील कचरा उचलला जात नसल्याने रहिवाशी त्रस्त झाले होते. याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर ‘कचरा फेको’ आंदोलन करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका पौर्णिमा सोनवणे त्यांचे पती व 15 ते 20 कार्यकर्त्यांवर सोमवारी (दि.1) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेचे गटनेते सचिन चिखले पाठोपाठ ही महापालिकेची दुसरी कारवाई आहे. 

रूपीनगर, त्रिवेणीनगर, म्हेत्रे वस्ती परिसरातील आणि हाउसिंग सोसाट्यांमधील कचरा उचलला जात नसल्याने परिसरात जागोजागी कचर्‍याचे साचून आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेविका पौर्णिमा सोनवणे थेट कचर्‍याचे वाहन शुक्रवारी (दि.29) महापालिका भवनात आणून प्रवेशद्वारासमोर कचरा टाकला होता. तो कचरा महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी साफ केला. त्यामुळे नगरसेविका सोनवणे (वय 42, रा. रूपीनगर, निगडी),  त्याचे पती रवींद्र आप्पासाहेब सोनवणे (वय 46)आणि 15 ते 20 कार्यकर्त्यांवर पिंपरी पोलिसांत महापालिका प्रशासनाने गुन्हा नोंदविला आहे. 

महापालिकेचे सहायक सुरक्षा अधिकारी विलास बाबासाहेब वाबळे (वय 55, रा. चर्‍होली) यांनी फिर्याद दिली आहे. विनापरवानगी आंदोलन, महापालिका परिसरात दुगर्र्ंधी पसरविणे आणि सरकारी कामात अडथळा अशी तक्रार आहे. यापूर्वी मनसेचे गटनेते चिखले व पदाधिकार्‍यांनी महापालिका भवनासमोर कचरा टाकल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भान नगरसेविका सोनवणे यांनी सांगितले की, राजकीय सुडबुद्धीने ही कारवाई झाली आहे. नागरिकांच्या समस्या महापालिकेत मांडायचा नाहीत, तर त्या कोठे मांडायचा. नागरिकांसाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी, या पुढेही असे आंदोलन केले जाईल.