Fri, Apr 26, 2019 17:20होमपेज › Pune › राज्य लोकसेवा आयोगाचा विद्यार्थ्यांवर अन्याय

राज्य लोकसेवा आयोगाचा विद्यार्थ्यांवर अन्याय

Published On: Jan 01 2018 2:03AM | Last Updated: Dec 31 2017 10:57PM

बुकमार्क करा
पिंपरी : वार्ताहर

स्पर्धा परीक्षेस बसणार्‍या मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांबाबत राज्य लोकसेवा आयोगाने समांतर आरक्षणाची जाचक भूमिका घेतली आहे. आयोगाचे हे कृत्य म्हणजे भारतीय संविधानाच्या आरक्षणाच्या हेतूला हरताळ फासणारे आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना या अन्यायाला सामोरे जावे लागते,  असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केले आहे.

आयोगाद्वारे शासनाच्या 2014 च्या परिपत्रकाचा आधार घेत समांतर आरक्षण सुरू केले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी प्रशासनातील उच्च पदापर्यंत मजल मारली; मात्र राज्य  लोकसेवा आयोगाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून अर्ज करू नका, असा फतवा जारी केला आहे. गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय विद्यार्थी खुल्या प्रवर्गातून निवडले जात होते; मात्र सरकारने ऑगस्ट 2014 मध्ये एक परिपत्रक काढून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून लढायचे असेल, तर खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क भरा, असा उल्लेख केला आहे.

त्यानुसार मागासवर्गीय विद्यार्थी खुल्या प्रवर्गातून परीक्षा देत आहेत; मात्र निवडीवेळी  त्यांच्याकडे शाळेचा दाखला मागितला जात असून, त्याावरील जात पाहिल्यानंतर तुम्हांला खुल्या प्रवर्गातून निवडता येणार नसल्याचे पत्र विद्यार्थ्यांना पाठविले जात आहे. समांतर आरक्षण योग्य प्रकारे राबविले जात नसल्याने अनेक विद्यार्थ्यांची निवड रोखली गेली आहे.