Wed, Nov 14, 2018 12:49



होमपेज › Pune › सफाई कामास स्वयंसेवी  संस्थांना प्राधान्य देणार

सफाई कामास स्वयंसेवी  संस्थांना प्राधान्य देणार

Published On: Jan 02 2018 1:51AM | Last Updated: Jan 02 2018 12:54AM

बुकमार्क करा




पिंपरी ः प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शासनाच्या नियमानुसार रस्ते व गटाराच्या दैनंदिन सफाई कामासाठी पूर्वीप्रमाणे स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांना प्राधान्य दिले जाईल. सध्या कामगार ज्या ठिकाणी काम करीत आहेत, ते त्याच ठिकाणी काम करतील. ईएसआय व पीएफ फंड संबंधित कामगार व संस्थांना अदा केली जाईल, असा निर्णय झाल्याने पिंपरी-चिंचवड शहर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांचे फेडरेशनचे उपोषण आंदोलन मागे घेण्यात येणार आहे. 

या संदर्भात ‘पुढारी’ने सातत्याने वृत्त प्रसिद्ध करून या प्रश्‍नास वाचा फोडली होती. राज्य शासनाच्या नियमानुसार स्वयंरोजगार सेवा संस्थांना सफाईचे काम न देता मोठ्या ठेकेदारांना महापालिका काम देत असून, त्या प्रकारे निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे संस्था व त्यांच्या कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळणार असल्याने संस्थांच्या फेडरेशनने पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात उपोषण आंदोलन सुरू केले आहे. उपोषणाचा सोमवारी (दि.1) सातवा दिवस होता. या मागणीसंदर्भात फेडरेशनने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल 
केली आहे. 

आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी महापालिका भवनात सोमवारी बैठक झाली. या वेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आरोग्य विभागाचे प्रमुख मनोज लोणकर, कष्टकरी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, फेडरेशनचे अध्यक्ष संदीपान झोंबाडे, सचिव गोरखनाथ पवार आणि पदाधिकारी उपस्थित होते. राज्य शासनाच्या नियमानुसार स्वयंरोजगार संस्थांना महापालिकेच्या वतीने सफाईची कामे प्राधान्याने दिली जातील. कामगारांचा पीएफ महापालिकेच्या खात्यावर जमा आहे. तो संबंधित कामगारांना अदा केला जाईल. 

तसेच, संस्थांकडून जमा झालेला ईएसआय व विनाकारण घेतलेल्या दंडाची रक्कम त्यांना परत केली जाईल. सध्या कंत्राटी कामगार ज्या ठिकाणी काम करीत आहेत, त्या ठिकाणीच त्यांना काम दिले जाईल. त्यांच्यावर बेकारीची कुर्‍हाड कोसळणार नाही, असे आश्‍वासन सत्तारूढ पक्षनेते पवार यांनी दिले. सदर निर्णयाची  महापालिका प्रशासनाच्या वतीने अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही मनोज लोणकर यांनी दिली. सुमारे अर्ध्या तास ही बैठक झाली. फेडरेशनच्या पदाधिकार्‍यांनी आपल्या मागण्या मांडल्या. त्यावर सविस्तर चर्चा झाली. झालेल्या निर्णयावर मंगळवारी (दि.2) लेखी पत्र महापालिकेच्या वतीने दिले जाणार आहे. त्यानंतर आंदोलन मागे घेतले जाईल, असे फेडरेशनचे अध्यक्ष झोंबाडे यांनी सांगितले.