Thu, Apr 18, 2019 16:29होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवड वाहतूक नियंत्रण कक्ष वाकडमध्ये

पिंपरी-चिंचवड वाहतूक नियंत्रण कक्ष वाकडमध्ये

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 26 2018 12:18AMपिंपरी : संतोष शिंदे

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वाहतुकीचे नियंत्रण वाकडमधून करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. त्यासाठी भुजबळ चौक येथील वाकड पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीची डागडुजी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. 

पिंपरी-चिंचवड आयुक्तालय 15 ऑगस्ट रोजी कार्यान्वित करण्यात आले. अपुर्‍या मनुष्यबळावर पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची घडी बसवताना वरिष्ठ अधिकार्‍यांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. शहारात वापराविना धूळखात पडलेल्या इमारती शोधून काढण्याचे काम काही अधिकार्‍यांवर सोपवण्यात आले आहे. अधिकारी हजर होतील तसे हळूहळू आयुक्तालयातील विविध शाखा सुरु करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.  

आयुक्तालयासाठी सर्वात महत्त्वाचे असणारे पोलिस नियंत्रण कक्ष पिंपरी पोलीस ठाण्यानजीकच्या एका व्यायामशाळेच्या इमारतीमध्ये सुरु करण्यात आले आहे. तर वाहतूक नियंत्रण कक्षासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी वाकडची निवड केली आहे.  वाकडच्या भुजबळ चौक येथील उड्डाणपुलाखाली पोलीस ठाण्याची जुनी इमारत आहे. वाकड पोलिस ठाण्याचा कारभार नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित केल्यापासून ही इमारत धूळखात पडून होती. या इमारतीच्या दोन खोल्यांमध्ये वाकड चौकीचे कामकाज सुरु करण्यात आले होते. तर इतर चार खोल्या रिकाम्याच होत्या. या चार रिकाम्या खोल्यांपैकी दोन खोल्यांमध्ये वाहतूक नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार आहे. याठिकाणी वाहतुक नियंत्रण कक्षासाठी एक सहायक पोलीस निरीक्षक आणि चार ते पाच कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. 

गुन्हे शाखादेखील वाकडलाच?

वाकड भुजबळ चौक येथील पोलिस ठाण्याच्या जुन्या इमारतीतील दोन खोल्या वाहतूक नियंत्रण कक्षासाठी देण्यात आल्या आहेत. तर याच इमारतीमध्ये आणखी दोन खोल्या रिकाम्या आहेत. या उर्वरित दोन खोल्यांमध्ये गुन्हे शाखेचे कामकाज चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे.