Tue, Mar 26, 2019 21:54होमपेज › Pune › ‘स्वच्छ’मध्ये पिंपरी-चिंचवडचा क्रमांक तीसच्या आत

‘स्वच्छ’मध्ये पिंपरी-चिंचवडचा क्रमांक तीसच्या आत

Published On: Dec 27 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 1:28AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ शहर’ स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहराचा क्रमांक वीसपर्यंत येणे अपेक्षित आहे. जास्तीत जास्त शहराचा क्रमांक तीसच्या आत येऊ शकतो, असा विश्‍वास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी (दि.26) व्यक्त केला. 

स्वच्छ शहर स्पर्धेत 2017 मध्ये महापालिकेचा शहरातील एकूण 464 शहरामध्ये 72 वा क्रमांक आला होता. सन 2016 मध्ये 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 75 शहरांमध्ये महापालिकेने नववे स्थान पटकाविले होते. यंदा हा क्रमांक तीसच्या आत असेल, असे आयुक्तांना वाटत आहे. मात्र, महापालिका, नगरपालिका व कॅन्टोन्मेंट बोर्डासह 4 हजार 41 लहान-मोठे असे तब्बल 4 हजार 41 शहराची संख्या लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहराला आपले स्थान तीसमध्ये आणण्यासाठी मोठी मेहनत घेण्याची गरज आहे. 

केंद्र शासनाच्या पथकाच्या वतीने 4 जानेवारीपासून  शहराचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती रॅली काढली जात आहे. केंद्र शासनाचे स्वच्छता मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे सर्वांना आवाहन केले जात आहे. महापालिकेने सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांसह त्यांच्या कुटुंबियांना सदर मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सक्ती केली आहे. याबाबतची माहिती देताना आयुक्त हर्डीकर पत्रकारांशी बोलत होते. आयुक्त हर्डीकर म्हणाले की, हागणदारी मुक्त (ओपीडी फ्री) शहरासाठी महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. त्यास गती देऊन शहर हागदारीमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यास आता कोठे यश मिळत असून, शहर हागणदारी मुक्त घोषित झाल्यास पिंपरी-चिंचवड स्वच्छ शहर स्पर्धेत टिकून राहील. 

त्याचबरोबर शहरात ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे जमा केला जात आहे. शहरातील मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये हा उपक्रम 5 जून 2017 पासून प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आला आहे. तसेच सफाई कामगार स्वत: ओला व सुका कचरा वेगळा करीत आहेत. हे प्रमाण 30 टक्के आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळा वाहून नेण्यासाठी पुरेशा संख्येने वाहने आणि वेगवेगळा कचरा जमा करण्यासाठी बिन्स कंटेनर उपलब्ध नसल्याने त्यास मर्यादा येत आहेत. 

हाउसिंग सोसायट्यांना ओला कचरा स्वत:च जिरवण्याची अटी महापालिका करणार असून, त्यांच्याकडून केवळ सुका कचरा स्वीकारला जाईल. पुढे तोही कचरा घेणे बंद केले जाईल. त्यासाठी शुल्क आकारण्याचे नियोजन आहे. पाठोपाठ लहान सोसायट्या आणि घराघरांतून ओला व सुका कचरा वेगवेगळा स्वीकारला जाईल. पर्यावरणपूरक आदर्श हाउसिंग सोसायटी स्पर्धेतील विजेत्या सोसायट्यांना मिळकतकराच्या सामान्य करात सूट दिली जाईल. सदर सोसायट्यांना ओला व सुका कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची अट आहे.